भाजपला सेनेचा दणका

सदस्याला सभापतीपदी बसवून 200 कोटींची कामे मंजुर

नवी मुंबई ः शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेने गाफिल सत्ताधार्‍यांना चांगलेच कोंडीत पकडून 200 कोटींचे प्रस्ताव पाच मिनिटांत मंजुर केले. सत्ताधारी वेळेवर स्थायी समितीत उपस्थित न राहिल्याने विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी रंगनाथ औटी यांना सभापतीपदी बसवून कामकाज उरकल्याने नाईक गटाला मोठा दणका मिळाल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. 

शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत 200 कोटी रुपयांचे 52 प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील दिघा विभागात रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे 58 कोटीचे काम नेरुळ औद्योगिक क्षेत्रातील डी ब्लॉकमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे 56 कोटींचे काम, परिमंडळ 1 व 2 मधील उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीचे 35 कोटींचे काम, सीबीडी येथे वाहनतळ बांधण्याचे 30 कोटी 16 लाख यासारखे  200 कोटींंच्या प्रस्तावांचा समावेश होता. स्थायी समितीच्या बैठकीची वेळ सुरुवातीला 11 वा. ठेवण्यात आली होती. नंतर ती 10 वा. करण्यात आली. या प्रस्तावांमध्ये बहुंताश विरोधकांच्या प्रभागातील कामांचा समावेश होता. विरोधकांनी गेल्या तीन स्थायी समितीच्या बैठकीत आपले प्रस्ताव मंजुरीसाठी घ्यावेत म्हणून सभापतींकडे तकादा लावला होता. 

शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेचे सर्व समिती सदस्य स्थायी समिती सभागृहात उपस्थित होते. परंतु सत्ताधारी पक्षांचे कोणतेही नगरसेवक वेळेवर उपस्थित न राहिल्याने शिवसेनेने रंगनाथ औटी यांना सभापतीपदी बसवून सभेचे कामकाज सुरु केले. प्रशासनाने सादर केलेले 200 कोटींच्या प्रस्तावांना तातडीने विनाचर्चा पाच मिनीटांत मंजुरी देऊन कामकाज पुर्ण केले. सेनेच्या या पवित्र्याने गोंधळलेल्या प्रशासनाला व उपस्थित दोन सत्ताधारी नगरसेवकांना घडणार्‍या घटनांकडे साक्षीभावाने पाहणे एवढेच हाती उरले होते. शिवसेनेने दाखवलेल्या या चलाकीमुळे नाईक गटाला मोठा दणका बसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सत्ताधार्‍यांकडून हे प्रस्ताव पुन्हा आणण्याचे संकेत मिळत असून शिवसेना त्याला विरोध करेल असे चौगुलेंच्यावतीने सांगण्यात आले. 

पालकमंत्र्यांकडे दाद मागू

शिवसेनेने केलेेले काम हे नियमानुसार असून स्थायी समिती सभागृह चालवण्यासाठी लागणारा कोरम त्यावेळी असल्याने उपस्थित सदस्यांनी सभापती निवडून वरील कामकाज पार पाडले आहे. हे कामकाज जर बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून झाल्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत दाद मागू असे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सांगितले.