विरोधी पक्षनेते विजय चौगुले निर्दोष

खुनशी राजकारणाचा बळी ; सहा वर्षानंतर पुसला कलंक

नवी मुंबई ः ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 376 मधून 12 मार्चला निर्दोष मुक्त केले. गेले चार निवडणुकांमध्ये गाजणार्‍या या विषयाला पुर्णविराम मिळाल्याने चौगुले यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर हा निकाल आल्याने शिवसेनेेत उत्साहाचे वातावरण असून आपण खुनशी राजकारणाचा बळी ठरल्याची प्रतिक्रिया चौगुले यांनी या निकालानंतर दिली आहे. 

चौगुले यांनी 2006 मध्ये गणेश नाईकांची साथ सोडल्यानंतर त्यांच्या मागे अनेक प्रकरणात चौकशीचा ससेमिरा लागला होता. गुन्हेगार संतोष जाधव यांच्या खुन खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर डिसेंबर 2014 साली चौगुले यांच्यावर बलात्काराचा गुन्हा एका महिलेने दाखल केला होता. यानंतर चौगुले यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन ते बॅकफुटवर गेले. या गुन्ह्यांविरुद्ध टिकेची झोड त्यावेळी मनसेपासून राष्ट्रवादीपर्यंत सर्वांनी उठवून चौगुलेंची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा  प्रयत्न केला होता.  चौगुले यांना जानेवारी 2015 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणात अंतरिम जामिन दिल्यानंतर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवून याबाबत पुन्हा नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने आपला पुर्वीचा दिलेला निर्णय तसाच ठेवून चौगुले यांचा जामिन कायम केला. 

या खटल्याची सुनावणी गेले दोन वर्षे ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. 12 मार्चला चौगुले यांच्या वाढदिवशीच याचा निकाल येऊन त्यांना या खटल्यातून निर्दोष सोडण्यात आले. गेले सहा वर्षे आपल्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांना न्यायालयानेच आपल्या आदेशाने उत्तर दिल्याचे त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना सांगितले. आपण खुनशी राजकारणाचा बळी ठरलो असून उशीरा का होईना न्याय मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.