शिवसेनेचे ‘आदेश’जोरात

नवी मुंबई ः महापालिकेवर भगवा फडकवण्याच्या इराद्याने शिवसेना कामाला लागली असून नवी मुंबईतील महिला मतदारांची मने जिंकण्यासाठी ‘होम मिनिस्टर’ फेम लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांना मैदानात उतरवले आहे. भाऊजींच्या ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमास जोरदार प्रतिसाद महिलावर्गातून मिळत असून त्याचे मतदानात किती रूपांतर होते, यावर या खेळाचा निकाल अवलंबून असल्याची चर्चा महाविकास आघाडीत आहे.  

एप्रिलमध्ये होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या उमेदवारांकडून वापरल्या जात आहेत. सध्या नवी मुंबईत हळदीकुंकू समारंभाचे पेव फुटले असून, सर्वच इच्छुक उमेदवार गल्लोगल्ली याचे आयोजन करत आहेत. शिवसेनेने हळदीकुंकू सोबत राज्यात टीव्हीवरील महिलांचा आवडता कार्यक्रम असलेल्या ‘होम मिनिस्टर’ फेम लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांना मैदानात उतरवले आहे. ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नवी मुंबईकरांसमोेर येत असून या कार्यक्रमाते पैठण्या व सोन्याच्या वस्तू महिलांना भेट म्हणून देण्यात येत आहेत. बांदेकरांच्या कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती राहत असून त्याचा फायदा शिवसेनेला होणार असल्याची भीती विरोधक व्यक्त करत आहेत. आतापर्यंत शिवसेनेने बांदेकर यांचे पाच कार्यक्रम नवी मुंबईत आयोजित केले असून, अजून पाच कार्यक्रम घेण्याची मनीषा जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केली आहे. 

शिवसेनेच्या या रणनीतीचा धसका विरोधकांनी घेतला असून, बांदेकरांच्या ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमासमोर तेवढाच भक्कम कार्यक्रम देण्यास ते असमर्थ ठरले आहेत. बांदेकर टीव्ही स्टार म्हणून महिला गर्दी करत असल्या तरी त्याचे मतात रूपांतर होणार नसल्याची खात्री विरोधक देत आहेत. भाजपचे मतदार हे ठाम असून नाईकांच्या विकासाच्या मार्गावर त्यांचा विश्‍वास असल्याचे अनेक भाजप नगरसेवकांनी सांगितले. ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपचाच खेळ मांडियेला विजयी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, शिवसेना बांदेकरांच्या कार्यक्रमांना मिळणार्‍या प्रतिसादामुळे उत्साहित असली तरी निवडणुकीच्या निकालानंतरच या खेळात विजयी कोण ते ठरणार आहे.