‘ते’ खेळाडूही निरिक्षणाखाली

पनवेल ः दुबईहून रविवारी 18 खेळाडू मुंबईत आले होते. त्यांना पनवेल महापालिकेने खास बस करून पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र येथे त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तीन खेळांडूंना ठेवून सर्वांना घरी पाठवले. यामुळे अशाप्रकारच्या कारभारामुळे संताप व्यक्त झाल्याने घरी पाठवलेल्या खेळाडूंनाही निरिक्षणाखाली आणण्यात येणार आहे. 

दुबईतून 18 खेळाडू परतल्यावर त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्व खेळाडूंना खारघर येथील ग्रामविकास भवनामध्ये ठेवण्यात येणार होते. मात्र, डॉक्टरांनी केवळ तीन जणांना थांबवून अन्य 15 जणांना घरी सोडले. यामुळे ठेवायचे असेल तर सर्वांनाच ठेवा नाहीतर आम्हीही जातो, असा पवित्रा या खेळाडूंनी घेतला. यावेळी पोलिसही दाखल झाले होते. त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती. मात्र, हे सर्व खेळाडू घरी निघून गेल्याने पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी डॉक्टरांनी तातडीने बैठक बोलावली असून यामध्ये पुन्हा या खेळाडूंना निरिक्षणासाठी आणण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. रायगड, पनवेलमधील खेळाडू शारजाहून परतले; 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.