‘समांतर’ मधून स्वप्नील जोशी आणि सतीश राजवाडे यांचे वेब सिरीजमध्ये पदार्पण

कायमच आपले वेगळेपण जपणारा अभिनेता स्वप्नील जोशी अनेक हिट सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. हा अभिनेता आता पहिल्यांदाच ‘समांतर’ नावाच्या मराठी वेब मालिकेत दिसेल. या मालिकेची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने केली असून पहिल्यांदाच वेब सिरीज सेगमेंटकरिता भागीदारी करण्यात आली. ही वेबसिरीज ओव्हर-द-टॉप (ओटीटी) वर प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.

स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडीत यांच्या मुख्य भूमिका या सिरीजमध्ये असणार आहेत. दोन्ही कलाकारांकरिता ही अशाप्रकारची पहिली वेब सिरीज आहे. ही मालिका सुहास शिरवळकर यांच्या समान नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. सध्या ही वेब सिरीज एमएक्स प्लेयर या क्षेत्रातील अग्रगण्य ओटीटी मंचावर उपलब्ध आहे.

‘समांतर’ ही वेब सिरीज ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एन्टरटेनमेंट अँड मीडिया सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांची निर्मिती असून अनेक भाषांमध्ये यशस्वी सिनेमे देणार्‍या या कंपनीची ‘समांतर’ ही पहिलीच वेब प्रकारातील कलाकृती ठरली आहे. मोगरा फुलला, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण, विकी वेलिंगकर अशा सिनेमांची निर्मिती आजवर या कंपनीने केली. मनोरंजन क्षेत्रात सर्जनशील विषय हाताळणारे निर्माता म्हणून स्वत:चे नाव सिद्ध करणारा जीसिम्स’ महाराष्ट्रातील अग्रेसर स्टुडीओ आहे. मनोरंजन उद्योगातील निर्मिती, सिने सादरीकरण, टीव्ही मालिका निर्मिती, सिनेमा विपणन आणि प्रचार तसेच सॅटेलाईट अ‍ॅग्रीगेशन असे अनेक प्रांत कंपनी हाताळते.