गृहप्रकल्पात करणार स्वंतत्र व्यवस्था

परदेशातून आलेल्या नागरिकांना ठेवणार देखरेखीखाली 

पनवेल ः कोरोना विषाणुची सर्वत्र दहशत पसरली असून सर्वांमध्ये भिती पसरली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरावर काळजी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी केल्यानंतर रुग्णालयापासून दूरवर काही काळ देखरेखीखाली ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी पनवेल तालुक्यातील कोन गावात असलेल्या इंडियाबुल्स येथील गृहप्रकल्पातील एक हजार घरे ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

करोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेल्या देशांतील भारतीय नागरिक मायदेशी परतत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूसंसर्गाला जागतिक साथीचा रोग घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन परदेशांतून ेेेयेणार्‍या नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक परदेशी नागरिक पनवेल तालुक्यात परत आले असून कामोठे शहरात परदेशातून आलेला एक नागरिक करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करून कार्यवाहीला सुरुवात केली आहे. रुग्णालयातून तपासणी केल्यानंतर रुग्णालयापासून दूर अंतरावर रुग्णांना तपासणीचा काळ पूर्ण होईपर्यंत ठेवायचे असल्यामुळे त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे लुसियाना लँड डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीच्या इंडिया बुल्स गृहप्रकल्पातील रेंटल हाऊसिंग योजनेतील इमारत क्रमांक 3 आणि 4 या 18 मजली इमारतीतील एक हजार घरे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. या खोल्यांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करून आवश्यक त्या आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, असे आदेश आहेत. पुढील आदेश येईपर्यंत इमारतीतील सर्व सामानासह खोल्या अधिगृहित कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे. पनवेल महापालिकेने ही कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.