पाऊण लाख किंमतीचा गांजा जप्त

गांजा विक्रि करणारी दुकली जेरबंद 

नवी मुंबई ः खारघरमधील कोपरा गाव येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या हिजबुल अब्दुल खालेक हक (25) व जियाउद्दीन अब्दुल मलेक (29) या दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी रात्री सापळा लावून अटक केली. यावेळी पोलिसांनी या दोघांजवळ असलेला पाऊण लाख रुपये किंमतीचा 5 किलो 470 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

कोपरा गावाजवळ दोन व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र बुधवंत व त्यांच्या पथकाने गेल्या शुक्रवारी रात्री सायन-पवनेल मार्गावर खारघर येथील कोपरा गावाजवळ सापळा लावला होता. यावेळी आरोपी हिजबुल अब्दुल खालेक हक व जियाउद्दीन अब्दुल मलेक हे दोघे तेथील बस थांब्यावर संशयास्पदरित्या आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी झडती घेतली असता हिजबुल हक याच्याजवळील बॅगेत सुटी पाने, फुले, काड्या व बिया असे संलग्न असलेल्या उग्र वासाचा ओलसर असा पाऊण लाख रुपये किमतीचा 5 किलो 470 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी हा गांजा जप्त करून दोघांना अटक केली. या दोघांवर खारघर पोलिस ठाण्यात एनडीपीएसनुसार गुन्हा दाखल केला. त्यांनी हा गांजा कुठून व कुणाला विक्री करण्यासाठी आणला होता, याबाबत अंमली पदार्थविरोधी पथकाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.