उद्याने, जॉगिंग पार्क बंद

नवी मुंबई : कोरोना व्हायरसची वाढती व्याप्ती पाहता सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. शासनास्तरावर वेळोवेळी खबरदारी घेतली जात असून गरजेनुसार अनेक ठिकाणे बंद केली आहे. नवी मुंबई महापालिकेनेही शहरातील गर्दीच्या सर्वच ठिकाणी बंदीची घोषणा केली आहे. याचाच भाग म्हणून रविवारी सायंकाळी राजीव गांधी ज्वागर्स पार्क, मिनी सि शोअर परिसर मोकळा करण्यात आला.

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. व्हायरस बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग अनेकांना होऊ शकतो. त्यामुळे पालिकेतर्फे गर्दीची सर्वच ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रातील उद्याने रविवार पासून महापालिका आयुक्तांचा पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित करण्यात आली. याचाच भाग म्हणून रविवारी सायंकाळी राजीव गांधी ज्वागर्स पार्क मोकळा करण्यात आला. शहरातील उद्याने, विरंगुळ्याची सार्वजनिक ठिकाणावरही प्रवेशबंदी करून गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. जॉगिंग ट्रॅकच्या ठिकाणीदेखील सूचना फलक लावून पालिकेने ट्रॅकवर प्रवेशबंदी करून गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. शाळांना सुट्या असल्याने लहान मुलांची उद्यानांमध्ये गर्दी जमण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेने सर्व उद्यानेदेखील वापरासाठी बंद केली आहेत. तर शाळांसह खासगी क्लासेस, ग्रंथालये, मंगल कार्यालये, हॉटेल्स यांनाही पुढील आदेश येईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश पालिकेने काढले आहेत.