आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कार्यक्षमतेत वाढ

नवी मुंबई ः कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 ची अंमलबजावणी सुरु झाली असून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोव्हिड - 19 चा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना करण्याकरिता सक्षम प्राधिकारी म्हणून महापालिका आयुक्त यांस घोषित करण्यात आले आहे.

या अनुषंगाने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व महावीर पेंढारी यांच्या नियंत्रणाखाली 16 मार्च ते 14 एप्रिल 2020 पर्यंत महापालिका मुख्यालयातील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये महानगरपालिका अधिकार्‍यांची विशेष नेमणूक करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये नियंत्रण अधिकारी असलेल्या अतिरिक्त आयुक्त यांचेसह समन्वय अधिकारी म्हणून प्रत्येक आठवड्यात प्रतिदिन सकाळी 8.00 ते रात्री 8.00 व रात्री 8.00 ते सकाळी 8.00 अशा 24 तासांसाठी विभागप्रमुख दर्जाचे अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या समन्वय अधिका-यांसमवेत प्रत्येक दिवशी सहकारी अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता व उप अभियंता / सहा. आयुक्त दर्जाचे 2 अधिकारी काम पाहणार आहेत.

या सर्व अधिकार्‍यांनी त्यांना नेमून दिलेल्या दिवशी विहित वेळेत आपले दैनंदिन कामकाज सांभाळून कोरोना विषाणूचा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये कार्यरत होऊन योग्य कार्यवाही करावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नवी मुंबईकर नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नये तसेच शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करीत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेऊन खोकताना, शिकताना हातरूमालाचा वापर करावा. आपले हात साबन व पाण्याने वारंवार स्वच्छ धुवावेत तसेच श्‍वसनसंस्थेचे विकार असणार्‍या व्यक्तीशी संपर्क ठेवताना स्वत:ची काळजी घ्यावी असे सूचित केले आहे.