कोरोनाच्या मुकाबल्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

पालिका रुग्णालयांत ठोस व्यवस्था ; आमदार गणेश नाईक यांनी केली पाहणी

नवी मुंबई ः सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने आमदार गणेश नाईक यांनी बुधवारी पालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाचा आणि वाशी सेक्टर 14 येथील बहुउददेशिय इमारतीमधील विलगीकरण कक्षाचा पाहणीदौरा केला. या रोगावरील उपचारासाठीच्या व्यवस्थेचा आढावा घेऊन पालिका आणि रुग्णालयांतील यंत्रणा सतर्क व तत्पर असून सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचे निरिक्षण त्यांनी नोंदवले.

प्रथम संदर्भ रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे यांच्याकडून आ. नाईक यांनी कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपायांची माहिती घेतली. महापौर जयवंत सुतार, नगरसेवक डॉ जयाजी नाथ, नगरसेविका नेत्रा शिर्के, माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत यावेळी त्यांच्यासोबत होते. प्रथम संदर्भ रुग्णालयात कोरोनावरील रुग्णांसाठी खास 38 खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. सेक्टर 14 येथील विलगीकरण कक्षात 30 खाटांचा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून त्यामध्ये देखरेखीसाठी ठेवण्यात येणार्या संभाव्य संशयीत रुग्णांसाठी जेवणापासून सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या दोन्ही कक्षात अद्याप नवी मुंबईतील एकही रुग्ण दाखल झालेला नाही. परदेशातून  परतलेल्या नवी मुंबईतील  विविध भागातील एकुण 52 व्यक्तींना त्यांच्या घरातच  14 दिवस वेगळे राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांची ओळख पटावी म्हणून त्यांच्या हातांवर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आलेला आहे. डॉ डी. वाय. पाटील रुग्णालय, एम.जी.एम. आदी खाजगी रुग्णालयांना सुचना करुन त्यामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. 


नवी मुंबई ही आमची केवळ जबाबदारी नाही तर शहरवासियांची काळजी देखील आहे. त्याच भावनेतून  कोरोनाविषयीच्या पालिकेच्या रुग्णालयांमधील व्यवस्थेची खात्री करुन घेतली. नागरिकांना मी आवाहन करेन की घाबरुन जावू नका मात्र वैद्यकीय खबरदारीच्या  सुचनांचे काटेकोरपणे पालन करा. आपण सर्व एकत्रित प्रयत्नांने दुसर्‍या टप्प्यातच कोरोनाचे निर्मुलन करु शकतो.

- आमदार गणेश नाईक