कोरोना रुग्णांशी दुजाभाव नको

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई : कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या 42वर पोहोचल्याचं सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या. राज्यातील 800 चाचण्यांपैकी 42 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच लक्षणं आणि ट्रॅव्हल हिस्ट्री असलेल्या लोकांचीच तपासणी केली जाणार आहे, असंही ते म्हणाले. तसेच कोरोना संशयित आणि एखादा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाशी दुजाभाव न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

कोरोनाची लक्षणं दिसल्या आणि परदेशी प्रवास केलेला असल्यासच कोरोनाची चाचणी केली जात आहे. याव्यतिरिक्त अन्य कोणतीही लक्षणं दिसल्यास चाचणी केली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  महाराष्ट्रात आतापर्यंत अनेकांच्या चाचण्या झाल्याचं सांगत यापुढे चाचण्या सुरु राहतील. पण, तूर्तास नागरिकांनी सतर्कता राखणं गरजेचं असल्याचं म्हणत त्यांनी कोरोना संशयित आणि एखादा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाशी दुजाभाव न करण्याचा इशारा दिला आहे. रुग्णांशी, संशयितांशी दुजाभाव करुन नका हे माणुसकीच्या विरोधात आहे. हा आजार बरा होणारा आहे त्यामुळे भयभीत होण्याचं कारण नाही. त्यामुळे रुग्णांना आणि संशयितांना कुटुंब आणि शेजार्‍यांनी मदत करा. या संसर्गामधून सावरणार्‍यांचं प्रमाण जास्त आहे ही बाबही लक्षात घ्या असं ते म्हणाले. रोगप्रतिकारशक्ती या व्हायरसवर मात करतेच आणि आपण त्यातून बाहेर पडतोच. त्यासाठी आपल्याला काही शिस्त किंवा गोष्टी पाळाव्याच लागतात. लक्षणावर आधारित उपचार घ्यावेच लागतात. तो पसरु याची काळजी घ्यावी लागते.