परदेशात 276 भारतीय कोरोनाग्रस्त

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची लागण विदेशात राहणार्‍या 276 भारतीय नागरिकांना झाली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेत दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 255 भारतीय नागरिक इराण, संयुक्त अरब अमिरातमध्ये 12,इटलीत 5, श्रीलंका, हॉन्गकॉन्ग, रवांडा, कुवैत मध्ये प्रत्येकी एका भारतीय नागरिकाला कोविड 19 ची बाधा झाली आहे.

इराणमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या भारतीयांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी भारतीय दूतावासची टीम काम करत आहे. तसेच इराण सरकारसोबत यासंदर्भात भारत सरकार सातत्याने संपर्कात देखील आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं. विशेष म्हणजे इराणमध्ये हजाराहून अधिक भारतीय असे आहेत जे भारतात परत येऊ इच्छित आहेत. आज एका विमानाने जवळपास 201 भारतीयांना सर्व तपासण्या करुन भारतात आणलं गेलं आहे. भारतात आतापर्यंत इराण, इटली आणि चीनसह अन्य देशांमधून 1600 हून अधिक भारतीयांना परत आणले गेले आहे.

फिलिपाइंस आणि मलेशियामध्ये अडकलेल्या भारतीयांना आणि खासकरुन विद्यार्थ्यांना मदत पोहोचवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयात तयार केलेलं कोविड19 सेल काम करत आहे. या दोन्ही देशातील दूतावासांशी संपर्क सुरु असल्याचे जयशंकर यांनी सांगितलं. 

देशभरात कोरोनाचे नवीन दहा रुग्ण

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज देशभरात कोरोनाचे नवीन दहा रुग्ण आढळून आले आहेत. एकूण 147 कोरोनाग्रस्त रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यामध्ये 122 भारतीय आहेत, 25 परदेशी नागरिक आहेत तर 14 लोकांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्च देण्यात आला आहे.