आखाती देशात 26 हजार भारतीय कोरोना संशयित

मुंबईत आणले जाण्याची शक्यता; यंत्रणा सज्ज

मुंबई : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 171 वर गेली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 47 झाला आहे. त्यात गुल्फ देश म्हणजेच युएई, कुवैत, कतार आणि ओमनमधून साधारण 26 हजार कोरोना संशयित मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. यासाठी मुंबईतील यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. 31 मार्चपर्यंत हेे रुग्ण मुंबई विमानतळावर दाखल होऊ शकतील. 

चीनच्या वुहान प्रांतातून जगभर पसरलेला कोरोना व्हायरस आतापर्यंत जवळपास 175 देशांमध्ये पोहचला आहे. दोन लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली असून सहा हजाराच्यावर लोकांचा यात मृत्यू झालाय. भारतातही या व्हायरसने आता हातपाय पसरायला सुरुवात केलीय. देशात 171 जणांना कोरोनाची बाधा झाली असून तीन जणांचा यात मृत्यू झालाय. विशेष म्हणजे एका दिवसात 20 जणांना याची लागण झाल्याची नोंद करण्यात आलीय. यात सर्वाधिक 47 महाराष्ट्रात असून त्याखालोखाल केरळचा नंबर आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. दुबईतून आलेले 15 जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना पवईतील नवे सेंटर तसेच मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.