2,651 दिवसांनी मिळाला निर्भयाला न्याय

चारही नराधमांना दिली फाशी

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी अखेर सात वर्षे तीन महिन्यांनंतर न्याय मिळाला आहे. दोषी चारही नराधमांना सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फासावर लटकवले. 2012 रोजी दिल्लीतील निर्भयावर क्रूरपणे बलात्कार करून हत्या करणार्‍या पापी नराधमांचा अखेर अंत झाला आणि निर्भयाला उशिरा का होईना न्यायव्यवस्थेने न्याय दिला. नराधमांना फाशी दिल्यानंतर तिहार जेलबाहेर नागरिकांनी तिरंगा फडकवून निर्भयाला न्याय दिल्याचा समाधान व्यक्त केले.

राजधानी दिल्लीत सात वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी आज न्याय मिळाला आहे. निर्भयाच्या चारही दोषींना तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दिल्ली हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत दोषीच्या वकिलांनी फाशी टाळण्यासाठी सगळे प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. 

आजचा दिवस निर्भयाचा आहे. संपूर्ण देश हा दिवस विसरणार नाही. उशिरा का होईना निर्भयाला अखेर न्याय मिळाला. त्यामुळे मी न्यायव्यवस्था आणि संविधानाचे आभार मानते. मी माझ्या मुलीला वाचवू शकले नाही, पण न्याय देऊ शकले याचे समाधान आहे. आजच्या या घटनेमुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्‍वास कायम राहील. आपल्याला योग्य न्याय मिळेल हा विश्‍वास त्यांच्या मनात आज पक्का होईल, अशी प्रतिक्रिया नराधमांना फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई आशा देवी यांनी दिली आहे. तर निर्भयाच्या वडिलांनी आम्ही निर्भयाला वाचवू शकलो नाही, याचे दु:ख सलत असल्याची भावना व्यक्त केली. मात्र, तरीही आज न्याय व्यवस्थेने योग्य न्याय दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.