महाविकास आघाडीचा गुन्हेगारांना दणका?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर गुन्हेगार नेते, कार्यकर्ते व समाजकंटकांवर तडीपारची कारवाई?

नवी मुंबई ः कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर नवी मुंबई महापालिकेची निवडणुक जरी पुढे ढकलली असली तरी ही निवडणुक निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने याबाबत गुन्हेगार पार्श्‍वभुमी असलेले राजकीय नेते व समाजकंटकावर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीसांना दिल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून कळत असून त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 

8 मे रोजी विद्यमान महापालिकेची मुदत संपत असून त्यापुर्वी महापालिका निवडणुक होण्याची शक्यता कोरोना विषाणुमुळे मावळली आहे. शासनाने नवी मुंबई महानगरपालिकेसह औरंगाबाद महापालिका व अनेक ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही निवडणुक शांततेत व निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पालिका हद्दीतील अनेक सामाजिक गुन्हेगार व गुन्हेगारी पार्श्‍वभुमी असलेल्या राजकीय दबंग नेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना नवी मुंबई पोलीस आयुक्तांना केल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून कळत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ऐरोली विधानसभा मतदार संघातील दिघा, ईलटणपाडा, यादवनगर भाग हा संवेदनशील भाग म्हणून गणला जातो. अनेक दबंग राजकीय पुढारी या क्षेेत्राचे प्रतिनिधीत्व करत असून त्यांच्याकडे असलेल्या गुन्हेगारी व दबंग कार्यकर्त्यांच्या मदतीने ते निवडणुक प्रभावीत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील संवेदनशील भागातील गुन्हेगारी पार्श्‍वभुमी असलेल्या राजकीय नेत्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची माहिती पोलीस आयुक्तालयाने जमा करण्यास सुरुवात केल्याचे कळत असून त्यांच्यावर तडीपारीसारख्या कारवाईंची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबई पोलीसांच्या या कारवाईची भनक लागल्याने त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत असून कोणावर कारवाई होणार याबाबत अनभिज्ञ असल्याने गुन्हेगारी पार्श्‍वभुमी असणार्‍या नेत्यांसह कार्यकर्ते व समाजकंटक यांचे धाबे दणाणले आहेत. 

पोलीस आयुक्तांच्या बदलीची शक्यता

नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची बदली करण्याचे घाटत असून त्यांच्याजागी महाविकास आघाडी सरकार  अन्य  आयुक्त नेमण्याची चर्चा सध्या मंत्रालयात आहे. अनेक अधिकार्‍यांची नावे याबाबत चर्चेत असून अजित पवार यांचा शिक्कामोर्तब झाल्यानंतर ही नेमणुक केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.