मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग खुला

पनवेल : रविवारी संपुर्ण दिवस जनता कर्फ्यु असल्याने नागरिकांनीही त्याला उत्फुर्त प्रतिसाद दिला. मात्र सोमवारी सकाळी अचानकपणे बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी गर्दी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ कळंबोली येथे झाली होती. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद केली होती. मात्र गर्दी ओसरल्याने पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग खुला करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तरी देखील मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. विशेषतः मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे वाहतूक पोलिसांचा लक्षात आल्याने पुण्याकडे जाणार्‍या वाहनांना कळंबोली येथेच रोखण्यात आले. यामुळे अनेक वाहनांना पोलिसांनी माघारी पाठविले. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक पोलिसांवर देखील मोठा ताण आला. वाहनांची संख्या कमी झाल्यावर पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले. कारण नसताना घराबाहेर पडून वाहतूक कोंडी करणार्‍या वाहन चालकांना यावेळी सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या वाहन चालकांनी घराबाहरे पडावे, असे अवाहनही त्यांनी केले आहे.