महाराष्ट्रावर आणखी एक संकट ?

मुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातले असून हे संकट अधिक गडद हात चालले आहे. त्यातच आता महाराष्ट्रावर आणखी एका संकटाचं सावट आहे. महाराष्ट्रात 24 आणि 25 मार्चला अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला आहे. 

देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असतानाच राज्याच्या काही भागांवर पुढील 48 तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्‍वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राजस्थानमध्ये 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, 26 मार्च इंदूर, उज्जैन, रतलाम, देवास, कोटा, सवाई माधोपूर, जोधपूर, उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, गांधीनगर आणि नाशिक अशा अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 मार्चपासून दक्षिण राजस्थान आणि गुजरातमध्ये पाऊस कमी होईल, परंतु मध्य प्रदेशात भोपाळसह अनेक शहरांमध्ये पाऊस सुरूच राहील असा स्कायमेटनं अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्यातील होणार्‍या या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.