अत्यावश्यक सेवांकरिता एन.एम.एम.टी. सुरु

नवी मुंबई ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनामार्फत लॉकडाऊन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवांकरिता एनएमएमटीची बस सेवा चालू ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. याकरिता संबंधित कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र एन.एम.एम.टी. बस वाहकाला दाखविणे गरजेचे राहील.  

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे (एन.एम.एम.टी.) बस संचलन जनता संचारबंदीच्या अनुषंगाने शनिवार 21 मार्च 2020 रोजी, रात्री 12.00 पासून रविवार, 22 मार्च 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. यापुढील काळातही कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाने रेल्वे तसेच इतर बस सेवा 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने परिवहन उपक्रमाचे बस संचलन रविवार 22 मार्च 2020 रोजी, रात्री 12.00 पासून मंगळवार, 31 मार्च 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत बंद राहणार आहे.

या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या वाहतुकीची अडचण होऊ नये व त्याचा परिणाम अत्यावश्यक नागरी सेवांवर पडू नये याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या निर्देशानुसार काही अत्यावश्यक सेवांना (उदा. हॉस्पिटल, महानगरपालिका, पोलीस, अग्निशमन, महावितरण, बँका, औषध कंपन्या, प्रसारमाध्यमे, टेलिफोन व इंचरनेट सेवा इ.) एन.एम.एम.टी. बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याकरिता संबंधित कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र एन.एम.एम.टी. बस वाहकाला दाखविणे गरजेचे राहील.