गोरगरीब लोकांना मोफत जेवण

सामाजिक संस्थांकडून जेवण ; भाजपचं महाभोजन अभियान

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर देशभरात लॉकडाऊन केल्याने गोरगरीब जनतेच्या पोटाला अन्न मिळेनासे झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणांहून सामाजिक संस्था समोर येत आहेत. भाजपनं देखील महाभोजन अभियान सुरु केलं आहे. या माध्यमातून रोज पाच कोटी गरीबांना भोजन देण्यात येणार आहे.

देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्यानो या काळात गरीब, मजूर तसेच रस्त्यावर फिरणार्‍या लोकांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. या लोकांच्या रोजगार आणि जेवणाची समस्या निर्माण झाली आहे. या घटकांच्या मदतीसाठी सर्व स्तरातून हात पुढे येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने ‘महाभोजन अभियान’ सुरु केलं असून रोज 5 कोटी गरीबांना या माध्यमातून जेवण दिलं जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात 21 दिवस भाजपकडून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय भाजप पदाधिकार्‍यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या 21 दिवसात भाजपकडून रोज पाच कोटी आणि 21 दिवसात 105 कोटी गरीब लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या निर्णयाची घोषणा केली. या “महाभोजन अभियाना” साठी भाजपकडून एक कोटी कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. यातील एक कार्यकर्ता रोज 5 गरीब लोकांची जेवणाची व्यवस्था करेल, असं सांगण्यात आलं आहे. भाजप आजपासून दररोज 5 कोटी गरीबांना भोजन देणार आहे. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी भाजपकडून एक कोटी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यासंदर्भात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली. तसेच पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येकी पाच जणांची जबाबदारी घेईल, असे नड्डा यांनी सांगितले. 

वाशीमध्ये कॅटरिंगचालकाचा उपक्रम

नवी मुंबईतील सर्व दुकाने, हॉटेल बंद राहिल्याने अनेकांची जेवणाची गैरसोय होवू लागली आहे. हे लक्षात घेवून वाशी येथील सदगुरू कॅटरींगकडून मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर मेसेज व्हायरल करीत ज्यांना जेवणाची गरज आहे, त्यांना फोन करुन ऑर्डर दिल्यास लोकांना घरपोच मोफत जेवण पोचवले जात आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील अनेकांनी या मोफत जेवणाची मदत घेतली आहे. विशेषता सोसायटीचे वॉचमन, साफसफाई कामगार, घरात एकट्या राहणार्‍या व्यक्तींकडून या मोफत जेवणाची सोय त्यांच्या कामी येत आहे. व्यवस्थित पॅकींग करून हे जेवण पुरवले जात आहे.

संस्थांनी पुढे यावं 

राज्यात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी, दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजानं, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.