कोरोना प्रतिबंधासाठी आ.गणेश नाईकांकडून 50 लाखांचा आमदारनिधी

नवी मुंबई ः महापालिकेच्या हद्दीमध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगाचा प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी प्रमाणित केलेले वैद्यकीय साहित्य आणि उपकरणे नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधून उपलब्ध करून देण्यासाठी आ. गणेश नाईक यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना बरे करण्यासाठी कार्यरत डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी जास्त संख्येने वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांची गरज भासणार आहे. ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊन आमदार गणेश नाईक यांनी आमदार निधीमधून 50 लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. या निधीचा तात्काळ वापर करून आवश्यक साधने आणि उपकरणे खरेदी करण्याची विनंती त्यांनी 31 मार्च 2020 रोजी पत्र पाठवून जिल्हाधिकार्‍यांना केली आहे. इन्फ्रारेड थर्मामीटर, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्स, कोरोना टेस्टिंग किट्स, आयसीसीयु व्हेंटिलेटर, विलगीकरण वार्ड स्थापन करण्यासाठी लागणारे आवश्यक सामान, फेस मास्क, ग्लोवज, सँनिटायजर इत्यादी साहित्य व उपकरणे आमदार निधी मधून विकत घेण्यात येणार आहेत.

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून कोरोना महामारी वर विजय प्राप्त करू, असा विश्‍वास आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. शासन-प्रशासन आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करावे. लॉक डाऊन च्या काळात  घरातच सुरक्षित राहावे. स्वतःची आणि इतरांची ही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.