भारतात कोरोनाचे तब्बल 386 नवे रुग्ण

नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. देशात आज दिवसभरात आतापर्यंत तब्बल 386 रुग्ण रुग्ण आढळलेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. 

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1,637 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडाही वाढला आहे. कोरोनाव्हायरसमुळे 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये एकाच दिवसात इतक्या झपाट्याने वाढ होण्याचे कारण निजामुद्दीन परिषद आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

दिल्लीच्या निजामुद्दीन तब्लिगी परिषदेने देश हादरला असून सर्वत्र खळबळ माजली आहे. या परिषदेनंतर कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. 2000हून अधिक लोकं या परिषदेला हजर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातील 441 लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. आता या परिषदेमध्ये सामिल झालेल्या आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या परिषदेमुळे झालेला हा आतापर्यंतचा 10 वा मृत्यू आहे. याआधी 6 लोकांचा तेलंगणात तर मुंबई, कर्नाटक आणि जम्मू काश्मीरमध्ये एकाचा मृत्यू झाला होता. दिल्लीतील कॅन्सर रुग्णालायतील डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या डॉक्टरला व्हायरसची लागण कुठून आणि कशी झाली हे अद्याप समजलेलं नाही. त्यानंतर संपूर्ण रुग्णालय सील करण्यात आलं आहे, त्याच्या कुटुंबाची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाते आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण  

राज्यात मंगळवारी एका दिवसात 72 कोरोनाव्हायरसचे नवे रुग्ण दाखल झाले. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. देशभरात कुठल्याही एका राज्यात एकदम एवढ्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. आता राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 230 वरून आकडा थेट 302 झाला.