जिद्द, संयम आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर हे युद्ध नक्की जिंकू

सावध व्हा, गर्दी टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेला दिलासा

मुंबई ः कोरोना विरूद्धचे युद्ध जिद्द आणि संयम असल्यावर आपणच जिंकू शकतो. मला खात्री आहे की हे युद्ध आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. लोक विनाकारण झुंबड करून खरेदी करताना दिसत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. सावध व्हावे, गर्दी टाळावी असे आवाहन केले. थेट प्रसारणाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी माणसे आणि यंत्रणा एकत्र करताना थोडा वेळ लागला त्यामुळे जनतेला थोडा त्रास झाला. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, आता ही वितरण साखळी सक्षमपणे कार्यान्वित झाली आहे. येत्या एक दोन दिवसात हा प्रश्‍न पूर्णपणे सुटेल. राज्यात जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची अजिबात कमी नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यासाठी गर्दी करू नये. तसेच कोणत्याही सरकारी कर्मचार्‍यांची पगार कपात करण्यात आली नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना संकटापाठोपाठ आर्थिक संकट येऊ नये, राज्याची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून हे वेतन टप्प्याटप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचार्‍यांचे पगार हे पहिल्यांदा दिले जातील, त्यामुळे वेतन कपात होईल ही भीती कुणीही मनात बाळगू नये, गैरसमज करून घेऊ नये.

राज्यात चाचणी केंद्र वाढले आहेत, त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. असे असले तरी अजून आपण काळजी घेतली तर विषाणूचा हल्ला परतवून लावू शकतो या स्थितीत आहोत. धोका आहे पण त्यामुळे घाबरून जाऊ नये, गर्दीही करू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले. लक्षणे आढळली तर पटकन उपचार करून घ्यावेत कारण योग्य वेळी उपचार झाले तर जीव वाचू शकतो हेही या दरम्यान स्पष्ट झाल्याचे सांगितले. खासगी डॉक्टरांनी आपआपले दवाखाने उघडा असे आवाहन देखील त्यांनी डॉक्टरांना दिले आहे. सर्दी खोकला आणि तापाची लक्षणे असलेले रुग्ण सरकारी दवाखान्यात पाठवा. परंतु इतर रुग्णांना वैद्यकीय सेवा द्या, घाबरून जाऊ नका असेही सांगितले. थंड पदार्थ खाणे शक्यतो टाळा अशा सुचना देखील त्यांनी दिल्या आहेत. तसेच एसीचा वापर कमी करा घरात मोकळी हवा येऊ द्या, या हवेत मी असं ऐकलं आहे की हा विषाणू कमी प्रमाणात येतो. संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असल्याने इतर राज्यातील कामगार, मजूर यांनी स्थलांतर करणे ताबडतोब थांबवावे असे सांगितले असूनही लाखो लोक स्थलांतर करताना दिसत असल्याबाबत चिंता व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्यासाठी राज्यात जवळपास 1 हजार केंद्रे सुरु करण्यात आली आहेत, तर आजघडीला दोन- सव्वादोन लाख स्थलांतरीत लोक, मजूर यांची तिथे व्यवस्था करण्यात आली आहे, इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील कामगार-मजुरांचीही ती राज्ये व्यवस्था करत आहेत, प्रत्येकजण माणुसकीचा धर्म पाळत आहेत, त्यांना अन्न, औषधे याचा पुरवठा केला जात आहे हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.