कोरोनावर मात करण्यासाठी पालिका रुग्णालय राखीव

नवी मुंबई ः देेशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नवी मुंबईतही करोनाबाधितांची संख्या 13 वर गेली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्णपणे कोरोना उपचारासाठी राखीव ठेवले आहे. या रुग्णालयातील अन्य वैद्यकीय सुविधा इतर खासगी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आल्या. या रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी)परिसरातील समाज मंदिरात सुरू केला जाणार आहे. शिवाय डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठीही खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील बेलापूरपासून ऐरोलीपर्यंतच्या महापालिका हद्दीत सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 13 रुग्ण पॅझिटिव्ह सापडले आहेत. दररोज या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी आयुक्तांनी आरोग्य विभागाला अनेक सूचना केल्या आहेत. कोरोना रुग्णांसाठी पालिकेच्या वतीने काही विशेष उपाययोजना केल्या गेल्या नव्हत्या. पालिकेच्या वतीने या रुग्णालयात विलीगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. कोरोनामुळे कस्तुरबा रुग्णालयाचा ताण वाढत आहे. तो कमी करण्यासाठी आपापल्या पालिका क्षेत्रात वैद्यकीय सुविधा उभारण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी वाशीतील महापालिका रुग्णालयात कोरोनासाठी विशेष रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या वाशीतील पालिका रुग्णालयातील तळ मजल्यावर कोरोना विभाग स्थापन करण्यात आला आहे. त्याच्या बाजूलाच पालिकेचे इतर विभागही कार्यरत आहेत. त्यात डायलिसिस विभाग आहे. दर तीन दिवसांनी रुग्णांना डायलिसिस करावे लागते. या रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. या विभागातील रुग्णांनाही आता एमजीएम रुग्णालय आणि डी.वाय.पाटील रुग्णालयातील डायलिसिस रुग्णालयात स्थलांतरित केले गेले. याचप्रमाणे रुग्णालयातील इतर सेवाही पालिकेच्या इतर रुग्णालयांत स्थलांतरित केल्या गेल्या आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली. सध्या बहुतांश खासगी रुग्णालय बंद असल्याने पालिकेतील ओपीडीमध्ये दररोज तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांसाठी पालिकेच्या समाज मंदिरात ओपीडी सुरू केली जाणार आहे.

प्रथम संदर्भ रुग्णालय कोरोनासाठी राखीव ठेवण्याकरिता पालिकेने 55 कोटींची तरतूद केली आहे. यातून सरकारने दिलेल्या निर्देशानुसार येथे वैद्यकीय व्यवस्था उभारली जाणार आहे. सध्या पालिकेने उभारलेल्या करोना विभागात 59 खाटांची सुविधा आहे, मात्र आता या ठिकाणी 120 खाटा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. हे रुग्णालय चालवण्यासाठी डॉक्टरांची गरज भासणार आहे, मात्र सद्यस्थितीत सर्वत्र परिस्थिती बिकट असल्याने बाहेरून डॉक्टर मागवणे शक्य नाही. त्यामुळे येथे असलेल्या खासगी डॉक्टरांची मदत त्यासाठी घेतली जाणार आहे. ज्यांना या ठिकाणी काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी पालिकेकडे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.