कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त

 मुंबई ः लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे तर कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत दिवसागणिक वाढणारे कोरोनाबाधित आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरबाबत सरकारची चिंता वाढली आहे. मृत्यू दर कमी कसा करता, येईल यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, सरकारने याबाबत उच्च स्तरीय समिती नेमली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, डॉक्टरांची हाय पॉवर समिती केंद्र सरकारच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलपेक्षा आणखी काही जास्त केलं पाहिजे का, याबाबत ही उच्चस्तरीय समिती अभ्यास करेल. त्याचप्रमाणे मृतांमध्ये मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असे आजार असलेले रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या कोमॉर्बिडीटी म्हणजे पूर्वीचा आजार हे प्रमुख कारण समोर आले आहे. याबाबतही समिती अभ्यास करुन लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे. मुंबईत धोका वाढला मुंबईत कोरोना व्हायरसचा धोका आणखी वाढला आहे. सोमवारी 4 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासांत कोरोनाचे 57 नवे रुग्ण आढळले आहेत. एवढेच नाही तर 150 संशयीत रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पूर्णपणे बरे झालेल्या 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 500 च्यावर पोहोचली आहे. तर एकट्या मुंबईत कोरोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाला आहे.