आयटी कंपनीमधील 19 जणांना कोरोनाची लागण

नवी मुंबई ः ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आयटी कंपनीमधील 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  हे कामगार नवी मुंबई, ठाणे, सांगलीसह इतर राज्यातील रहिवासी असून सर्वांना महानगरपालिकेच्या वाशी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

महापेमधील मिलेनियम बिझनेस पार्क परिसरातील कंपनीमध्ये हा प्रकार घडला आहे. बँकिंग विषयीचे काम पाहणार्‍या कंपनीमधील तब्बल 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 7 कामगार नवी मुंबईमधील रहिवासी आहेत. मुंबई मधील 7, ठाणेमधील 2, सांगली, तेलंगणा व आंध्रप्रदेशमधील प्रत्येकी एक कर्मचार्‍याचा यात समावेश आहे. सर्वांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. सदर कंपनी सील केली असून परिसराचे निर्जंतुकिकरण करण्यास सुरवात केली आहे. नवी मुंबईत एकाच ठिकाणी प्रथमच एवढे रूग्ण आढळले आहेत. सर्वांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन सर्वांची तत्काळ तपासणी करण्यात येणार आहे.