पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होणार

नवी मुंबई : महानगरपालिकेतील 111 नगरसेवकांचा कार्यकाळ 7 मे रोजी संपत आहे. महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होणार असून सर्व अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. महापौरांसह सर्व पदाधिकार्‍यांची वाहनेही जमा करण्यात आली आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी 7 मे 2020 पर्यंत आहे. या कालावधीपूर्वी सहावी पंचवार्षिक निवडणूक होणे आवश्यक होते. निवडणूक विभागाने यासाठी कार्यवाही ही सुरू केली होती, परंतु कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यमान नगरसेवकांचा गुरूवारी शेवटचा दिवस असणार आहे. 8 मेपासून महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ प्रशासक म्हणून काम पाहतील. सर्व अधिकार त्यांना असणार आहेत. कार्यकाळ संपल्यामुळे महापौर व इतर पदाधिकार्‍यांची वाहनेही जमा करून घेण्यात आली आहेत. पुढील निवडणूक होईपर्यंत महानगरपालिकेतील सर्व प्रस्ताव व निविदांना मंजुरी देण्याचे व धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार ही आयुक्तांना असणार आहेत.