इंधन व गॅसवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली

नवी मुंबई : इंधन व गॅसवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पालिका मुख्यालय ते कोकणभवन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणि मंत्री अस्लम शेख यांच्यासह नवी मुंबईतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 2014 पासून तब्बल 69 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले असून या इंधन दरवाढीतून केंद्र सरकारने 25 लाख कोटी रुपयांचा कर वसूल केल्याचा आरोप शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला.

दररोज वाढत जाणारेे पेट्रोल व डिझेलचे दर आणि घरगुती गॅस दर विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. आधीच कोरोनामुळे जगात आर्थिक मंदी परसली आहे. यामुळे सर्वांचेच बजेट कोलमडले आहे. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. इंधनाचे दर वाढत आहे. गॅसच्या किमंतीत वाढ होत आहे. यामुळे सामान्यांची आर्थिक परिस्थिती खालवत चालली आहे. मोदी सरकारच्या काळात एक नव्हे तर तब्बल 69 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. या महागाई आणि इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई काँग्रेसने आता नागरिकांना सायकल हाच पर्याय असल्याने या सायकल रॅलीचे आयोजन केले होते. आंदोलनाला कांग्रेसतर्फे 200 पेक्षा जास्त सायकल आणण्यात आल्या होत्या. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. याप्रसंगी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. त्यांनी भाजपवर टीका करीत इंधन दर नियंत्रित करण्यात शासनाला अपयश आल्याने वाहतूक खर्चही वाढला. परिणामी महागाईत प्रचंड वाढ झाल्याचा आरोप केला. 2014 पासून तब्बल 69 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले असून या इंधन दरवाढीतून केंद्र सरकारने 25 लाख कोटी रुपयांचा कर वसूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

तर अस्लम शेख यांनी, कोरोनाकाळात नोकर्‍या गेल्या, व्यवसाय बंद झाले परिणामी बेरोजगारी वाढली. मात्र केंद्र शासनाने याची काहीही दखल घेतली नसल्याचा आरोप केला. यावेळी माजी मंत्री व प्रदेश अध्यक्ष नसीम खान, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, माजी उपमहापौर अविनाश लाड, रमाकांत म्हात्रे, वाशी अध्यक्ष सचिन नाईक व कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी कोकण भवनपर्यंत सायकलवर जाऊन कोकण आयुक्तांना महागाईचा निषेध करणारे निवेदन सुपुर्द करण्यात आले. रॅलीसाठी फक्त दहा सायकलींना परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी यापेक्षा अधिक सायकलींचा वापर करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी 35 पेक्षा अधिक सायकली जप्त केल्या. रॅलीत  सामाजिक अंतरासह अनेकांना मुखपट्टीचा वसर पडला होता.