Breaking News
प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या पालिकेला सूचना
मुंबई : शहरात काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पहाटे प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वाढविण्याची सूचना त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना यावेळी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे पश्चिम उपनगरातील कलानगर जंक्शन, मिलन सबवे, टर्नर रोड, जॉगर्स पार्क आदी परिसरास भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाच्या आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, शहरात मागील काही दिवसात वाढलेले प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रस्त्यांवरील धूळ तसेच हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी दिवसाआड पाणी फवारणी करण्याच्या त्याचप्रमाणे वॉटर फॉगर, जेटींग मशिन, सक्शन मशिन, स्मॉग गन आदींचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते धुण्यासाठी एक हजार टँकर भाड्याने घेण्यात येणार आहेत. मुंबईत शासनाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच बांधकामाची अनेक कामे सुरू आहेत. या कामांच्या ठिकाणी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काम सुरू असलेल्या इमारतींना ग्रीन कव्हर अत्यावश्यक करण्यात आले आहे. डेब्रिस उघड्या वाहनांमधून नेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. अर्बन फॉरेस्टचे क्षेत्र वाढवून शहरावरील ग्रीन कव्हर वाढविण्यात येणार आहे. हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी शहरात 40 ठिकाणी वॉटर फॉगर आणि स्मॉग गन लावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यांबरोबरच छोटे रस्ते, गल्ल्या, नाले, समुद्र किनारे आदी ठिकाणी सुद्धा स्वच्छता ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
प्रारंभी डी विभागामध्ये पेडर रोड येथे दुभाजक स्वच्छता कामाची पाहणी करून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. एच पूर्व विभागामध्ये कलानगर, खेरवाडी जंक्शन, मराठा कॉलनी, मिलन भूयारी मार्ग परिसर; के पूर्व विभागामध्ये श्रद्धानंद मार्ग, दयालदास मार्ग, पायावाडी, मिलन उड्डाणपूल आणि त्यानंतर एच पश्चिम विभागामध्ये जुहूतारा रस्ता, लिंकिंग मार्ग आणि टर्नर मार्ग आदी ठिकाणी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी रस्ते, पदपथ स्वच्छता तसेच धूळ प्रतिबंधक कामांची पाहणी केली. दौऱ्याच्या अखेरीस त्यांनी वांद्रे पश्चिम येथील कार्टर रस्ता स्थित जॉगर्स पार्क येथे भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली.
दरम्यान वांद्रे पश्चिम येथील जॉगर्स पार्क परिसरास भेट दिली. येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शासनाच्या स्वच्छतेच्या कामात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी शिंदे यांच्या समोर आपापल्या भागातील समस्या देखील मांडल्या. जॉगर्स पार्क येथे उद्यानातील प्रसाधनगृहांमध्ये शौचकूपांची संख्या वाढवावी, उद्यानामध्ये अधिक झाडे लावून हिरवळ वाढवावी, असे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai