Breaking News
गतवर्षीपेक्षा 6 टक्क्यांनी वाढ; सायबर गुन्ह्यांचे आव्हान कायम
नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. एकूण 6656 गुन्ह्यांपैकी 4892 गुन्हे नवी मुंबई पोलीसांनी आपल्या वेगवान तपासाने उघडकीस आणले आहे. यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे व सायबर गुन्ह्ये रोखून ते उघडकीस आणण्याचे आव्हान पोलीसांसमोर कायम आहे.
नवी मुंबई शहरामध्ये 2023 या वर्षामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, मालमत्ता विषयक, फेटल अपघात, महिला अत्याचार यासारख्या गुन्ह्यात घट झाली असली तरी सायबर गुन्ह्यांचा आलेख चढताच राहिला आहे. मात्र, गतवर्षात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी एकही घटना घडली नाही. तसेच कुठल्याही प्रकारची जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडली नसल्याचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वार्षिक पत्रकार परिषदमध्ये स्पष्ट केले. या वार्षिक पत्रकार परिषद प्रसंगी अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, परिमंडळ-2चे उपायुक्त पंकज डहाणे, मुख्यालय उपायुक्त संजयकुमार पाटील, वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2023 मध्ये महिला विषयक दाखल झालेल्या एकूण 703 गुह्यापैकी 689 (98 टक्के) गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 2022 च्या तुलनेत महिला विषयक गुन्हे 59 ने कमी झाल्याचे दिसून येत आहे. 2023 मध्ये बलात्काराचे एकूण 299 गुन्हे दाखल झाले असून यातील सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. 2022च्या तुलनेत 2023 मधील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये 42 ने घट झाली आहे. तसेच 2023 मध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दाखल पोक्सोच्या एकूण 123 गुन्ह्यातील सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये पोक्सोच्या गुन्ह्यांमध्ये 7 ने घट झाल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे. 2023 मध्ये विनयभंगाचे 385 गुन्हे घडले असून त्यापैकी 371 गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यात 2022 च्या तुलनेत 22 ने घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सासरकडील मंडळींकडून होणाऱ्या छळवणुकीच्या गुन्ह्यात घट झाल्याचे दिसून येत असले तरी महिलांची छळवणूक, हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंबंधीच्या गुन्ह्यात 14 ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2023 मध्ये शरीराविरुध्दच्या एकूण 825 दाखल गुन्ह्यांपैकी 807 (98 टक्के) उघडकीस आले आहेत. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये शरीराविरुध्दच्या गुन्ह्यात 75 ने घट झाली आहे. यात 2023 मध्ये खुनाचे 37 गुन्हे घडले असून त्यातील 34 गुन्हे उघडकीस आले आहेत. 2022 च्या तुलनेत खुनाच्या गुन्ह्यात 2 ने घट झाली आहे. तर खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यात 10 ने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे दुखापतीच्या गुन्ह्यात तसेच गर्दीच्या गुन्ह्यात देखील घट झाली आहे. सन 2023 मध्ये आर्थिक फसवणुकीचे 812 गुन्हे घडले असून त्यापैकी 462 गुन्हे उघडकीस आले आहेत. 2022 च्या तुलनेत आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात 149 ने वाढ झाली आहे. यात ठकबाजीचे 445 गुन्हे दाखल असून त्यातील 369 गुन्हे उघडकीस आले आहेत. विश्वासघाताचे 56 गुन्हे दाखल असून त्यापैकी 53 उघडकीस आले आहेत. 2023 मध्ये पोलीस बतावणीच्या 8 घटना घडल्या असून या गुन्ह्यात 2022 वर्षाच्या तुलनेत 12 ने घट झाल्याचे दिसून येत आहे. 2023 मध्ये नवी मुंबईत मालमत्ताविषयक 234 दाखल गुन्ह्यांपैकी 1170 (50 टक्के) गुन्हे उघडकीस आले आहेत. 2022 च्या तुलनेत या वर्षामध्ये मालमत्ता विषयक गुन्ह्यांमध्ये 99 ने घट झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. एकूण आकडेवारीवरुन नवी मुंबई पोलिसांची 2022 वर्षाच्या तुलनेत 2023 मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात 6 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai