Breaking News
स्प्रेयरव्दारे धूलीकण प्रतिबंध
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या वतीने वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये पालिकेकडे असलेल्या दोन धूळ नियंत्रक वाहनांव्दारे नवी मुंबईतील मुख्य रस्ते प्रक्रियाकृत पाणी वापरुन स्वच्छ केले जात असून या वाहनातील स्प्रेयर प्रणालीव्दारे हवेतील धूलीकणांची सफाई केली जात आहे.
आयुक्तांच्या निर्देशानुसार परिमंडळ 1 विभागात वाशी रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथून डावीकडे सागर विहारपर्यंत व तेथून वळसा घालून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत तेथून डावीकडे वळत कोपरखैरणे घणसोली नोड जंक्शनपर्यंत व तेथून वळसा घालून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन डावीकडे वळत एपीएमसी मार्केट परिसरात साफसफाई करुन तेथून पुन: तुर्भे-वाशी मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत येऊन डावीकडे वळत वाशी रेल्वे स्टेशनपर्यंत रस्ते सफाई व धूलीकण स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे परिमंडळ 2 विभागात ठाणे बेलापूर मार्गावर तुर्भे उड्डाणपूलापासून सुरुवात करीत टी जंक्शन ऐरोलीपर्यंत सरळ व तेथून डावीकडे वळत ऐरोली मुलुंड खाडीपूलानजिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून वळसा घालून दिवा कोळीवाडा चौक मार्गे टी जंक्शनपर्यंत व तेथून डावीकडे वळत दिघागाव रेल्वे स्टेशन पर्यंत ठाणे बेलापूर रोडने सरळ जात तेथून वळसा घेऊन तुर्भे उड्डाणपूलापर्यंत सरळ अशा प्रकारे रस्ते स्वच्छता करण्यात आली. यापुढील काळातही शहरातील वाहने वर्दळीच्या विविध रस्त्यांची स्वच्छता अशीच सुरू राहणार असून प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुवून स्वच्छ केले जाणार आहेत तसेच या पाण्याचे स्प्रेयर हवेत फवारुन हवेतील धुलीकणांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत वायू गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने दोन मल्टीपर्पज स्प्रेयर आणि डस्ट सप्रेशन व्हेईकल उपलब्ध करुन घेतली असून याव्दारे हवा गुणवत्ता राखण्याकरिता पाण्याव्दारे रस्ते सफाई व हवेत उडणा-या पाण्याच्या फवाऱ्यांव्दारे धुलीकण प्रतिबंध केला जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai