नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 17, 2023
- 806
लोकार्पणाविना बेलापुर-पेंधर मेट्रो सेवेत दाखल
नवी मुंबई : बहुप्रतिक्षित असलेल्या नवी मेट्रोचा प्रवास अखेर उद्धाटनाशिवाय सुरु करण्यात आला आहे. या मार्गावरील स्थानकांची कामे पुर्ण होऊनही उद्घाटनाअभावी नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येत नव्हता. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्धाटन होणार म्हणून तीन वेळा या सेवेचे लोकार्पण पुढे ढकलले. अखेर उद्धाटनाला मुहुर्त व अतिथींना वेळ न मिळाल्याने 17 नोव्हेंबर रोजी विना सोहळा मेट्रो सेवेत दाखल झाली. दिर्घकाळ रखडलेली ही सेवा प्रत्यक्षात सुरु झाल्याने नवी मुंबईकरांचे मेट्रोची सफर करण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार उद्घाटनाची औपचारिकता न करता बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रोचा पहिला टप्पा 17 नोव्हेंबरपासून प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी घेतला. दीर्घकाळ रखडलेला बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज आहे. या मार्गावर एकूण 11 स्थानकांसह तळोजा पांचनंद येथे आगार (डेपो) आहेत. मेट्रोचे संचालन करण्यासाठी सिडकोने महामेट्रोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याची सर्व तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे. परंतु, केवळ उद्घाटनाच्या सोपस्कारासाठी हा प्रवास रखडला होता. नागरिकांमधून नाराजीचे सूर उमटू लागल्याने मेट्रो आता धावू लागली आहे. बेलापूर ते पेंधर दरम्यान दोन्ही स्थानकांतून दुपारी तीन वाजता पहिली मेट्रो धावली. 18 नोव्हेंबरपासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान सकाळी सहा वाजता पहिली मेट्रो धावणार असून, दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी रात्री दहा वाजता होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.
- मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार असून सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहर या लौकिकाला साजेशी उत्तम आणि सक्षम परिवहन व्यवस्था मेट्रोद्वारे निर्माण होणार आहे. - अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
तिकीटाचे दर
- - 0 ते 2 किमीच्या टप्प्याकरिता रु. 10,
- 2 ते 4 किमीकरिता रु. 15,
- 4 ते 6 किमीकरिता रु. 20,
- 6 ते 8 किमीकरिता रु. 25,
- 8 ते 10 किमीकरिता रु. 30
- 10 किमीपुढील अंतराकरिता रु. 40.
पंतप्रधानांची संधी हुकली
बहुचर्चित आणि महत्वाकांक्षा प्रकल्प असणाऱ्या नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची योजना गेले 3-4 महिन्यांपासून सिडकोने आखली होती. तीन वेळा मोदींचा नवी मुंबई दौरा रद्द झाल्याने मेट्रोचे उद्घाटनही रखडले. वाहतुकीस सज्ज असणारी ही सेवा केवळ उद्घघाटनाअभावी लोकसेवेत आणता येत नव्हती त्यामुळे नागरिकांनी व विविध राजकीय पक्षांनी रोष व्यक्त केला होता. वाढता रोष पाहता शासनाने उद्धाटनाचे सोपस्कार पार न पाडता मेट्रो सेवेत आणल्याने पंतप्रधान मोदी यांची नवी मुंबई मेट्रोच्या उद्धाटनाची संधी हुकल्याची कुजबूज नवी मुंबईत आहे.
स्थानक
- बेलापूर टर्मिनल
- आरबीआय कॉलनी
- बेलपाडा
- उत्सव चौक
- केंद्रीय विहार
- खारघर गाव
- सेंट्रल पार्क
- पेठपाडा
- अमनदूत
- पेठाली - तळोजा
- पेंधर
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai