
पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 30, 2024
- 423
नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे नियोजन
नवी मुंबई ः पावसाळी कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही याची काळजी घेऊन आवश्यक पूर्वतयारी करावी आणि 30 मे पर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिकेसह शहरातील इतर सर्व प्राधिकरणांनी आपत्ती नियंत्रणाच्या दृष्टीने पावसाळ्याआधी व पावसाळा कालावधीत परस्पर समन्वय आणि संवाद राखावा असे सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियोजन बैठकीप्रसंगी आयुक्तांनी पावसाळ्याच्या अनुषंगाने करावयाचा अत्यावश्यक कामांचा सविस्तर आढावा घेतला तसेच सध्याचा निवडणूक आचारसंहिता कालावधी लक्षात घेऊन ही कामे करण्यासाठी शासन पातळीवरुन आवश्यक परवानग्या घेणे गरजेचे असल्याचे लक्षात घेत याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशित केले. या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन प्रक्रिया तातडीने करुन ही कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी करावी असेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. महानगरपालिकेच्या क्षेत्रात एमआयडीसी भागात मोठया प्रमाणावर रस्ते व इतर कामे सुरु असून ती कामे जलद पूर्ण करावीत तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य जागांची एमआयडीसी व महानगरपालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संयुक्त पहाणी करुन त्या परिसरात नागरिकांचे वास्तव्य असल्यास त्यांना धोका लक्षात आणून देऊन त्यांचे स्थलांतरण करावे अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात असलेल्या झोपडपट्टया स्थलांतरणाबाबतही निर्देशित करण्यात आले. दिघा इलठणपाडा धरणाच्या खाली असणाऱ्या झोपड्यांच्या स्थलांतरणविषयक आवश्यक कार्यवाही करण्याचे यावेळी सूचित करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शहरातील मुख्य व मध्यवर्ती सायन पनवेल महामार्ग असल्याने तो खड्डेमुक्त व सुस्थितीत रहावा या दृष्टीने संपूर्ण काळजी घ्यावी तसेच तुर्भे उड्डाणपूलाचा एक आर्म तोडण्याचे काम सुरु असून वाहतूक पोलीसांच्या सहयोगाने वाहतूकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही व विशेषत्वाने पावसाळी कालावधीत याची अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. अशाच प्रकारे एमएमआरडीए मार्फत सुरू असलेल्या कामांमुळे नाल्यांच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही तसेच काही ठिकाणी खराब झालेला रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करावी असेही निर्देश देण्यात आले. महावितरणाची झाकण तुटलेली सबस्टेशन, उघडया केबल यांची दुरुस्ती तातडीने करण्याचे सूचित करत विशेषत्वाने मोठया ट्रान्सफॉर्मरच्या आसपास असणा-या अस्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. पावसाळी कालावधीपूर्वी धोकादायक झाडे व झाडांच्या फांदयांची गरजेएवढी छाटणी करण्याबाबत कार्यवाही सुरु करावी व पावसाळी कालावधीत जोरदार वाऱ्यामुळे पडणाऱ्या फांद्या लगेच उचलण्याबाबतच्या कार्यवाहीचे विभागवार नियोजन करावे असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. महानगर गॅस लिमीटेडने आवश्यक ती खबरदारी घेऊन वॉल्व्हच्या जागा जिओ टॅगींग कराव्यात व पावसाळी कालावधीत विशेष खबरदारी घ्यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्यंतिक गरजेशिवाय कोणत्याही नवीन खोदकामाची परवानगी देऊ नये व दिलेल्या परवानग्यांची कामे 15 मे पर्यंत पूर्ण करुन ते खोदकाम पूर्ववत केले जाईल याची दक्षता घ्यावी असेही निर्देशित करण्यात आले. पावसाळी कालावधीतील नालेसफाई व गटारे सफाईची कामे काटेकोरपणे व जलद गतीने विहित कालावधीत पूर्ण करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले व सर्व पावसाळापूर्व कामांचा स्वत: पहाणी करुन आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले.
- रेल्वे स्टेशन्समधील आवश्यक कामे पूर्ण करावीत
सिडको व रेल्वे प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने रेल्वे स्टेशन्समधील आवश्यक कामे पूर्ण करावीत व महानगरपालिकेसह तिन्ही प्राधिकरणांच्या अभियंत्यांनी संयुक्त पहाणी करुन आवश्यक कार्यवाही करण्याची खबरदारी घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. एपीएमसी मार्केट हा शहरातील एक महत्वाचा भाग असून येथील अंतर्गत स्वच्छतेबाबत संबंधित प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. - 24 तास नियंत्रण कक्ष सुरु
पावसाळी कालावधीतील साथरोग नियंत्रणासाठी तसेच मलेरिया व डेंग्यूसारख्या संभाव्य आजारांबाबत आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला करतांनाच पुरेसा औषधसाठा करुन ठेवण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र हेल्पलाईन कार्यान्वित करण्याबाबतही कार्यवाहीचे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळा कालावधीत महानगरपालिकेचा मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्ष तसेच विभागीय नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन केंद्रातील कक्ष हे 24 तास आवश्यक मनुष्यबळासह व यंत्रसामुग्रीसह सुसज्ज राहतील याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.
धोकादायक इमारती हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे लक्षात घेत धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या स्थलांतराबाबत कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. आठही विभाग कार्यालय स्तरावर आपत्तीकाळात अडचणीच्या प्रसंगी नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्याच्या जागा निश्चित करुन तेथे अन्नपदार्थांसह गरजेच्या वस्तू उपलब्ध राहतील याचे आत्तापासूनच नियोजन करुन ठेवावे अशाही सूचना देण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai