Breaking News
राजकीय दबावापोटी उपायुक्त राहुल गेठे यांची उचलबांगडी
नवी मुंबई : राज्यातील वाढलेली अतिक्रमणे व बेकायदा बांधकामे यांच्यावर कारवाई करावी म्हणून मुंबई उच्च न्यायालय पालिकांना सतत धारेवर धरत आहे. परंतु नवी मुंबई पालिका आयुक्तांनी राजकीय दबावापोटी तोडक कारवाईवरच अतिक्रमण करून उपायुक्त राहुल गेठे यांची तडकाफडकी बदली केली आहे. आयुक्तांचा हा निर्णय अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे मनोबल वाढवणारे असल्याची चर्चा नवी मुंबईत आहे.
राज्यात सरकारी जमीनींवर मोठ्याप्रमाणावर होत असलेली अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे उच्च न्यायालयाच्या रडावर असून प्रत्येक सूनावणीदरम्यान न्यायालय महापालिकांना खडेबोल सुनावत आहे. मागिल सूनावणीवेळी न्यायालयाने सर्व महापालिकांना त्यांनी केलेल्या कारवाईचा व पाठविलेल्या नोटीसांचा तपशिल शपथपत्र स्वरूपात सादर करण्यास सांगितला होता. न्यायालयात सूनावणीच्या काही दिवस अगोदर तोडक कारवाईचा फार्स होत असल्याचे सकृतदर्शनी दिसत असून सूनावणीनंतर सर्वत्र सामसूम झाल्याचे पाहायला मिळते.
नवी मुंबईत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामांना चांगलाच आळा बसला होता आणि नियमित तोडक कारवाई होत असल्याने राजकीय दबावापोटी त्यांचीही नवी मुंबईतून उचलबांगडी करण्यात आली. मुंढे यांच्यानंतर पुन्हा नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांचे पिक आले असून त्यात अधिकाऱ्यांसह स्थानिक राजकीय नेते आपली पोळी भाजून घेत आहेत.
वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉ.राहुल गेठे यांना नुकतेच शासनाने नवी मुंबई पालिकेत कायमस्वरुपी सामावून घेण्यास मंजूरी दिल्यानंतर त्यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा कार्यभार देण्यात आला. त्यांनी नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बार व रेस्टॉरंट, हॉटेलांमधील वाढीव बांधकामे तसेच एमपीएमसी परिसरातील व्यापाऱ्यांनी केलेली अतिक्रमणे पाडण्याची मोठी कारवाई केली होती. सदर कारवाईमुळे उपायुक्त गेठे पंधरवड्यात चांगलेच प्रकाशझोतात आले होते. त्यांच्या या तोडक कारवाईचे राजकीय पडसाद नवी मुंबईत उमटल्याने आयुक्त नार्वेकर यांनी त्यांच्याकडून अतिक्रमण विभागाचा पदभार काढून तो उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्याकडे सोपवला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे जवळचे समजले जाणारे गेठे यांची झालेली तडकाफडकी बदलीने पालिकेत खळबळ माजली आहे. अनेकांनी या बदलीचे स्वागत केले असून त्यासाठी पालिका आयुक्त नार्वेकरांना धन्यवाद देत आहेत. आयुक्तांच्या या निर्णयाचे नकारात्मक पडसाद नवी मुंबईत उमटले असून त्याचा नको तो संदेश अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना गेल्याने भविष्यात पुन्हा अनधिकृत बांधकामांचे पेव फूटेल अशी भीती अनेकजण व्यक्त करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai