Breaking News
पनवेल : डायघर येथील ठाकूरवाडीमधून मंगळवारी बेपत्ता झालेल्या 12 वर्षांच्या बालकाचा मृतदेह पनवेलमधील किरवली गावाजवळ संशयीतरीत्या मृतावस्थेमध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली. या मूकबधीर बालकाचा खून शरीर सूखासाठी युवकाने केल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी काही तासांत या खून प्रकरणातील मारेकरी युवकाला ताब्यात घेऊन डायघर पोलीसांच्या स्वाधीन केले.
12 वर्षीय बालकाच्या बेपत्ता प्रकरणी मंगळवारी डायघर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. तळोजा पोलीसांना बालकाचे शव सापडल्यानंतर त्यांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तळोजा पोलीसांसोबत नवी मुंबई पोलीसांचे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी बालकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दिवसभर चौकशी करत होते. बालकाच्या मृतदेहाचा शव विच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल रात्री उशीरा पोलीसांच्या हाती येईपर्यंत बालकाच्या मृतदेहाची अवस्था पाहून पोलीस अधिकारी शिंदे व त्यांच्या पथकाने बालक राहत असलेल्या ठिकाणाहून काही संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांची उलट तपासणी केली. मृतदेह ज्या ठिकाणी होता त्या परिसराकडे जाणाऱ्या रस्त्याकडील सीसीटिव्ही कॅमेरे पोलीसांनी वारंवार तपासून पाहीले. बालकाचे कपडे आणि अंगवस्त्र मृतदेहाशेजारी काढल्याचे पोलीसांना घटनास्थळी दिसले तसेच एक गुटख्याची पुडी पोलीसांना मृतदेहाशेजारी सापडली होती. या एका गुटख्याच्या पुडीवरुन पोलीसांनी ताब्यात असणाऱ्या संशयीतांकडे चौकशी केली. रात्री उशीरापर्यंत संशयीतांना डायघर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामधील एका 21 वर्षीय युवकाने शरीर सूखासाठी बालकाचा खून केल्याची कबूली पोलीसांना दिली. डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संदीपान शिंदे यांनी बालकाच्या खूनाप्रकरणी संबंधित 21 वर्षीय युवकाला अटक केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai