Breaking News
स्थगिती आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी
नवी मुंबई ः शासनाचे विशेष लेखा परिक्षक वर्ग 2 यांनी विशेष लेखा परिक्षण करुन श्री गणेश सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर नेरुळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या विशेष लेखा परिक्षणावरील चाचणी अहवालाला सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे अशोक गावडे यांच्या कारभाराविरुद्ध रान उठवणाऱ्या मंगल घरत यांनी आता वळसे-पाटील यांच्या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ‘आजची नवी मुंबई'शी बोलताना सांगितले.
नेरुळ येथील श्री गणेश सोसायटीतील अंतर्गत वादाने आता वेगळे वळण घेतले आहे. अध्यक्ष अशोक गावडे यांच्या मनमानी कारभाराविषयी उपनिंबधक सहकारी संस्था यांचेमार्फत विशेष लेखा परिक्षण करावयास लावले असता अनेक धक्कादायक बाबी लेखापरिक्षक विजय पाखले यांनी आपल्या अहवालात नोंदवल्या आहेत. त्यामध्ये संस्थेचे 39.93 लक्ष रुपयांचे नुकसान संबंधित समितीने केल्याचा आरोप ठेवून अध्यक्ष अशोक गावडेंसह इतर 46 समिती सदस्यांवर नेरुळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
श्री गणेश सोसायटीने सदर चाचणी अहवालाला सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सहकार कायद्यांतर्गत अर्ज करुन सदर अहवालावरील कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पुढील आदेश होईपर्यंत सदर कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत ही स्थगिती उठत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई होणे शक्य नसल्याने याबाबत मुंबई उच्च न्यायालयात आपण दाद मागणार असल्याचे मंगल घरत यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले.
सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे व श्री गणेश सोसायटीचे अध्यक्ष अशोक गावडे यांचे जुने संबंध असल्याचे मंगल घरत यांनी सांगितले. श्री गणेश सोसायटीचे भूमिपूजनाच्यावेळी आमदार दिलीप वळसे-पाटील उपस्थित असल्याचे सांगत त्यांनीच गावडे यांच्या सर्व मनमानी कारभाराला पाठिशी घातले असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करुन गावडे यांची बेहिशोबी मालमत्ता त्यांच्या निदर्शनास आणून देवूनही गावडे यांच्यावर पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही. ज्यावेळी या तक्रारी करण्यात आल्या त्यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील होते असाही सूचक इशारा त्यांनी कारवाई न होण्यामागील कारणासाठी दिला.
सहकार मंत्री वळसे-पाटील आपल्या अधिकाराचा दुरउपयोग करुन सामाजिक गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याने यांच्याविरुद्ध आम्ही राज्यपाल व मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे. कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना गावडे यांना संरक्षण देण्यासाठी सहकार मंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिल्याचा आरोप अनेक सदस्यांनी केला आहे. त्यामुळे आता सहकार मंत्र्यांचा कारभारच न्यायालयात उघडा पाडण्याचा निर्णय सोसायटी सदस्यांनी घेतला आहे. श्री गणेश सोयायटीच्या अंतर्गत कलहाने आता वेगळे वळण घेतले असून या वादात सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाच खेचण्याचा निर्णय सदस्यांनी घेतल्याने स्थगिती आदेशामुळे सहकार मंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अनेक विधीतज्ञ व्यक्त करत आहेत.
श्री गणेश सोसायटीत सदनिका विकत घेणारे गेली 30 वर्ष गावडे यांच्या अन्यायाला बळी पडले आहेत. अनेकवर्ष लढा दिल्यानंतर सहकार विभागाने संबंधित सोसायटीचे लेखा परिक्षण करुन गुन्हा नोंदवला आहे. परंतु सहकार मंत्र्यांच्या एकाच आदेशाने लढा देणाऱ्या सर्वांच्या परिश्रमावर पाणी फेरले आहे. आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास असून आम्ही या अन्यायाविरुद्ध आता न्यायालयात दाद मागू. - मंगल घरत, सोसायटी सदस्य
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai