Breaking News
नवनगर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध
उरण : एमएमआरडीएच्या माध्यमातून तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण आदी 124 महसुली गावातील जमिनी संपादित करण्यासाठी अधिसुचनेविरोधात हरकती नोंदविण्यासाठी 30 दिवसांची मुदत वाढवून देण्याच्या मागणीला नगररचना विभागाच्या सहसंचालकांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या जवळपास 10 हजार ग्रामस्थांनी बुधवारी, गुरुवारी कोकण भवन येथील नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांकडे हरकती सादर केल्या.
तिसऱ्या मुंबईसाठी रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण आदी 124 महसुली गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यात येणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील उरण-29, पनवेल-7, पेण -88 गावे याशिवाय मुंबई महानगर प्रादेशिक योजना क्षेत्रातील 2 आणि रायगड प्रादेशिक योजना क्षेत्रातील 9 गावांचा समाविष्ट करण्यात आलेल्या अशा एकूण 124 महसूल गावांचा समावेश आहे. तिसऱ्या मुंबईच्या या एमएमआरडीएच्या प्रकल्पामुळे येथील शेतकरी संपूर्ण उध्वस्त होणार आहेत. त्यांचे उदरनिर्वाहीचे साधनही नष्ट होणार आहे.कवडीमोल भावाने शेतकऱ्यांकडून जमीनी संपादन करुन भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे.त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीलाच विरोध करुन एक इंचही जमीन न देण्याचा निर्णय येथील हजारो शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी झालेल्या बैठकीतुन एकमुखाने घेतला आहे. मुदतीत शेतकऱ्यांच्या हरकती नोंदविण्यासाठी एमएमआरडीए भूसंपादन विरोधी समितीच्या नेतृत्वाखाली गावोगावी शेतकऱ्यांच्या सभा,बैठका घेऊन जनजागृती करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. 4 मार्चपासून सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. त्याला या विभागातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याचाच एक भाग म्हणून येथील भूधारकांकडून मोठ्या प्रमाणात सूचना आणि हरकती सादर केल्या जात आहेत. बुधवारी कोकण भवन येथील सहसंचालक नगररचना कार्यालयात जवळपास सहा हजार तर गुरुवारी 4000 हरकती सादर केल्या. गेल्या दोन दिवसांत 10 हजारांहून अधिक ग्रामस्थांच्या प्रातिनिधिक हरकती येथील नगरसंचालनालय कार्यालयात नोंदवण्यात आल्या आहेत. दररोज शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या या हरकतींचे एकत्रीकरण करण्यासाठी येथील कार्यालयाला वेगळा कक्षच उघडावा लागला आहे. अचानक वाढलेल्या या प्रमाणामुळे नगररचना कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. हरकती नोंदवण्यास येणारे ग्रामस्थ तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान, या हरकतींचे योग्य प्रकारे संकलन केले जात आहे, अशी माहिती कोकण विभागाचे सहसंचालक (नगररचना) जितेंद्र भोपळे यांनी दिली.
राज्य शासनाने सादर केलेल्या नवनगर प्रकल्पाच्या प्रारूप आराखड्यात अनेक त्रुटी असून त्यामुळे येथील ग्रामस्थांची शंभर टक्के जमीन हिरावून घेतली जाणार असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी नोंदविला आहे. शेतकऱ्यांनी नगर रचना विभागाच्या सहसंचालकांकडे सादर केलेल्या अर्जात विविध प्रकारच्या 9 मुद्यांवर हरकत नोंदविली आहे. तर दोन सूचना केल्या आहेत. सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी 3 एप्रिलपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे पुढील चार पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे. मुंबई पारबंदर प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी नवनगर प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. याअंतर्गत अधिसूचित 124 गावांतील संपूर्ण जमिनी सक्तीने संपादित केल्या जाणार आहेत. नवी मुंबई प्रकल्पात झाले, तेच या नवनगर प्रकल्पात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध असल्याचे शहाजी आनंदराव पाटील यांनी स्पष्ट केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai