Breaking News
नवी मुंबई ः शाळांना दिवाळीच्या सुट्टया सुरु होत असून मुलांना सुट्टीच्या कालावधीत उदयानांमध्ये खेळण्याचा आनंद घेता यावा यादृष्टीने उदयान विभागामार्फत सुरु असलेली उदयानांमधील खेळणी दुरुस्तीची कामे जलद पूर्ण करावीत व मुलांचा सुट्टीचा आनंद व्दिगुणीत करावा असे निर्देश देत शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुरु असलेल्या व प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्तांनी घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते. पालिकेच्या वतीने बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींची यादी तयार करण्यात यावी व त्या इमारती ज्या कारणासाठी बांधलेल्या आहेत तशा प्रकारचा वापर सुरु करण्याच्या दृष्टीने जलद कार्यवाही करावी असे निर्देश देतानाच आयुक्तांनी पुढील विभागप्रमुख बैठकीत त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश दिले. नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्क मधील एका राइडचे सुरु असलेले कामही त्वरीत पूर्ण करुन घ्यावे अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यातही महत्वाचे म्हणजे बच्चे कंपनीचे विशेष आकर्षण असलेल्या टॉय ट्रेन सुरु करणेबाबत गतीमान कार्यवाही करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
कोपरखैरणे येथे से.14 व से.16 या ठिकाणी सुरु असलेले नागरी आरोग्य केंद्र इमारतीचे काम आगामी 15 ते 20 दिवसात पूर्ण होत असून त्याठिकाणी नागरी आरोग्य केंद्र प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक वैदयकिय मनुष्यबळ व औषध साठा आणि वैदयकिय उपकरणे उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ऐरोली विभागात यादवनगर येथील शाळा इमारत बांधकाम पूर्ण झाले असून दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा नवीन इमारतीत भरेल यादृष्टीने कार्यवाही करा असेही सूचित केले. त्याचप्रमाणे घणसोली येथील शाळा इमारत बांधून तयार असून त्याठिकाणीही दिवाळीनंतर शाळा सुरु करणेबाबत पाहणी करावी आणि कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. लिडार सर्वेक्षण, ईआरपी प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा याविषयी संबंधितांची दिवाळीपूर्वी स्वतंत्र बैठक घेऊन या कामांना गती देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे पार्कींग धोरण या अत्यंत महत्वाच्या विषयावर वाहतुक पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांची संयुक्त बैठक आयोजित करावी असेही निर्देश दिले. केंद्र सरकारमार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' हे अभियान उत्साहात राबविले जात असून यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे दिवाळीच्या काळात प्लास्टिक पिशव्या टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात यावे आणि विभाग कार्यालय पातळीवर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात असेही सांगितले.
पालिकेने नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन केले असून त्या कार्यवाहीकडे लक्ष द्यावे तसेच दिवाळीच्या कालावधीत पुरेशा प्रमाणात योग्य दाबाने पाणीपुरवठा राहील याची काटेकोर दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एमआयडीसी मार्फत होणारा पाणीपुरवठाही योग्य प्रकारे होईल अशा प्रकारे एमआयडीसी प्राधिकरणालाही सूचित करण्यात यावे आणि नागरिकांना पाण्याबाबत त्रास होणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai