5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 10, 2023
- 1085
नवी मुंबई : राज्यातील थेट पणनसह खासगी बाजार आवार संदर्भात विविध बाबींचा अभ्यास करण्यासाठी सप्टेंबरमध्ये सहकार विभागाने एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या कार्यकक्षेत आता राज्यातील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर या 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचाही समावेश केला आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालास जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी कायद्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. शेतकरी व इतर बाजार घटकांसाठी पर्यायी बाजार व्यवस्थेची तरतूद केली तरीही शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आता राज्यातील थेट पणनसह खासगी बाजार आवारांचा अभ्यास करून ते खरोखरच शेतकऱ्यांना लाभदायक आहेत किंवा नाही, याचा अभ्यास करण्यासाठी सहकार विभागाने माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली 13 सप्टेंबर 2023 रोजी एक समिती स्थापन केली होती. गठित केलेल्या अभ्यासगटाच्या कार्यकक्षेत शेतकरी- ग्राहक बाजार, थेट पणन, कंत्राटी शेती करार, इलेक्ट्रॉनिक व्यापार व्यासपीठाद्वारे पणन या पर्यायी बाजार व्यवस्ाथांचा समावेश करण्यात आला होता. तसेच अभ्यास गटास शासनाला अहवाल सादर करण्यास 45 दिवासांची दिलेली मुदत 30 दिवसांनी वाढवून 75 दिवस केली होती.
1 अध्यक्ष, 10 सदस्य, 2 व्यापारी प्रतिनिधी आणि 1 खाजगी बाजार प्रतिनिधी अशा एकूण 14 जणांच्या स्थापन केलेल्या समितीच्या कार्यकक्षेत आता राज्यातील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर या 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचाही समावेश केला आहे. दांगट यांच्या अध्यक्षतेखालील समितीला 75 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या समितीत पणन सचिव, संचालकांसह औरंगाबाद, नाशिक आणि विदर्भातील शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. मात्र, आता या पाच बाजार समित्यांचाही समावेश केल्याने तिला मुदतवाढ मिळू शकते.
समितीची अभ्यासकक्षा
- राज्यातील खासगी बाजार आवार, शेतकरी ग्राहक बाजार यांना प्रातिनिधिक स्वरूपात भेटी देऊन तेथे सुरू असलेले कामकाज, सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करणे,
- कृषिमालाचे विपणन पारदर्शक, खुल्या पद्धतीने व स्पर्धात्मक लिलावाद्वारे होते किंवा नाही, याची पडताळणी करणे.
- कृषिमालास मिळणारा बाजारभाव, कपाती, रक्कम अदा करावयाची व्यवस्था व कालावधीचे निरीक्षण करणे, शेतकऱ्य़ांना विक्रीपश्चात वेळेत रक्कम मिळते किंवा नाही,
- कृषिमाल लिलाव पद्दतीने विक्री होतो किंवा नाही ते पाहणे
- कृषिमालाची किंमत बाजारभावाप्रमाणे आहे की नाही याची पडताळणी करणे
- कृषिमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार रोखीने न होता डिजिटल पद्धतीने होतात की नाही, याबाबत खात्री करणे.
- बाजारात अत्यावश्यक सेवा योग्य पुरविल्या जातात किंवा नाही याची प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करणे,
- बाजार आवारात आगप्रतिबंधक सेवा पुरविली आहे की नाही, याबाबत तपासणी करून अहवाल सादर करणे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai