Breaking News
नवी मुंबई ः देशात एप्रिल महिन्यातील रामनवमीच्या मुहूर्तावर लोकसभा निवडणुका होण्याच्या शक्यतेने सर्व ईच्छुक उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. ठाणे मतदारसंघाचे माजी खासदार संजीव नाईक हे पुन्हा एकदा ठाण्यासह नवी मुंबईत सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपच्या संघटनात्मक बैठका तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठींच्या निमित्ताने नाईक यांनी गेल्या काही महिन्यांपासून संपर्क मोहीमेला सुरुवात केल्याने यावेळी खासदारकीची निवडणूक ते लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप ठाणे लोकसभा मतदार संघावर दावा करीत असून जवळपास उमेदवारही निश्चित केलेले आहेत. मात्र महाविकास आघाडीकडून ठाणे लोकसभा मतदार संघ हा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. तर सन 2014 आणि 2019 या दोनवेळा लोकसभेचे मैदान मारणाऱ्या राजन विचारे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे (पान 7 वर)
नक्की आहे. तर दुसरीकडे भाजपने ठाणे लोकसभा उमेदवार म्हणून राष्ट्रीय स्वयंसंघाचे कार्यकर्ते विनायक सहस्त्रबुद्धे यांचे नाव पुढे केले आहे. सहस्त्रबुद्धे यांनीही समाजातील विशिष्ट स्तरातील लोकांसाठी निरनिराळे कार्यक्रम व चर्चासत्रे आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे. तर भाजपच्या वतीनेच माजी खासदार डॉ. संजीव नाईक हे देखील ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. अशात नवी मुंबईवर एकहाती सत्ता असणाऱ्या आमदार गणेश नाईक यांचे सुपुत्र माजी खासदार संजीव नाईक यांनी जनसंपर्कात जोर पकडल्याने ते यावेळी विद्यमान खासदार राजन विचारे यांना चांगलीच टक्कर देतील असे बोलले जात आहे. संजीव नाईक यांनी तळागाळातील पारंपरिक मतदारांना भेटण्याचा सपाटा लावला असून पहिल्यांदाच ते नवी मुंबईच्या अभामंडळात तळपतांना दिसत आहेत. परंतु, भाजप कोणाच्या पारड्यात हा मतदार संघ टाकतो यावर तसेच मिरा-भाईंदरपासून नवी मुंबईच्या राजकारणावर पक्कड ठेवणाऱ्या गणेश नाईकांच्या भुमिकेवर या मतदारसंघाचा निकाल अवंलबून असल्याची चर्चा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे