Breaking News
भूखंड विक्रीच्या दोन योजनांचा प्रारंभ
नवी मुंबई ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, सिडकोने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ 15 ऑगस्ट 2021 रोजी झाला. त्याचप्रमाणे, भूखंड विक्रीच्या अन्य दोन योजनांचाही प्रारंभ या दिवशी करण्यात आला.
कोविड-19 महासाथीच्या काळात आपल्या प्राणांची पर्वा न करता डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्यांनी अविरपणे आपले कर्तव्य बजावले. या कोविड योद्ध्यांप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून या योद्ध्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने ही गृहनिर्माण योजना आणली आहे. सदर गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोड्समध्ये 4,488 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या योजनेकरिता अर्ज करण्याकरिता संबंधित कर्मचार्यांकडे कोविड योद्धा किंवा गणवेषधारी कर्मचारी म्हणून सक्षम अधिकार्याकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे. अर्जदारांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 15 ऑगस्ट 2021 ते 07 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये पार पडणार आहे, तर योजनेची संगणकीय सोडत 16 सप्टेंबर 2021 रोजी काढण्यात येणार आहे.
कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचार्यांनी कोविड महासाथीचा प्रसार रोखण्यासाठी केलेले कार्य हे अतुलनीय असून त्यांच्या या कार्याला नमन म्हणून सिडकोने राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्याकरिता विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे. अधिकाधिक कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचार्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. भूखंड विक्रीच्या अन्य दोन योजनांद्वारे अनुक्रमे शहरातील बांधकाम क्षेत्राला चालना मिळण्यासह विविध नोड्समध्ये पेट्रोल पंप/गॅस स्टेशन सुविधा उपलब्ध होणार आहेत. - डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai