Breaking News
सिडकोची तातडीने निविदा मंजुरी व संचालक मंडळाची मोहर
नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेतील 65 हजार घरे विकण्यासाठी 700 कोटी रुपयांचा दलाल नियुक्त करण्याचे काम पचवलेल्या सिडकोने नैना प्रकल्पासाठी अर्बन डिझाईन/ मास्टर फ्लॅनिंग आर्किटेक्चर प्रदान करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला आहे. या सल्ल्याची किमंत 425 कोटी असून हा सल्ला कोणाच्या सल्ल्यापोटी घेण्यात आला याची सुरस चर्चा सिडकोच्या दुसऱ्या माळ्यावर सुरु आहे.
सिडको नवी मुंबईत 674 हेक्टर जमिनीवर नैना हा प्रकल्प राबवत असून त्यावर आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पास स्थानिकांचा मोठा विरोध होत असूनही सिडको हा प्रकल्प राबविण्यासाठी जंगजंग पछाडत आहे. सिडकोने नुकतेच नैना क्षेत्राचे अर्बन डिझाइन करण्याकरिता सल्लागार नेमण्यासाठी जाहीरात दिली होती. शहरांचे शिल्पकार म्हणून जगात ओळख असणाऱ्या सिडकोला अर्बन डिझाईनींगसाठी जाहिरात द्यावी लागत आहे याबाबत मोठे आश्चर्य अनेकांनी व्यक्त केले आहे. एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी सल्लागार नेमणे हे संयुक्तीक आहे परंतु, संपुर्ण शहराच्या मास्टर फ्लॅनिंगसाठी सल्लागार नेमणे हे सिडकोसारख्या संस्थेला लाजिरवाणी गोष्ट आहे. ही 425 कोटींची निविदा प्रक्रिया कोणाच्यातरी सल्ल्यापोटीच राबवली जात असल्याचे बोलले जात आहे.
प्राप्त तीन निविदांपैकी एक निविदा तांत्रिक छाननीत बाद ठरली तर मे. हितेन सेठी ऍन्ड असोसिएट्स आणि मे. आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रक्टर हे पात्र ठरले. या पात्र निविदाकारांचा आर्थिक देकार 3 जानेवारी रोजी उघडण्यात आला व त्याच दिवशी सर्व अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन प्रस्ताव संचालक मंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला. सिडको एवढे जलद काम कोणाच्यातरी विशिष्ट सल्ल्यापोटीच करते हा आजवरचा अनुभव आहे.
नैना क्षेत्राचा विकास आराखडा (डीपी प्लॅन) तसेच नैनाच्या पहिल्या टप्प्यातील 23 गावांचा विकास 11 नगर नियोजन योजनांच्या माध्यमातून (टीपी स्कीम) सिडकोच्या नियोजनकार व वास्तुविशारदांनी गत दहा वर्षे राबून बनविला आहे आणि त्याचा वापरही शासन मान्यतेनंतर सुरु केला आहे. असे असताना आता नैना क्षेत्राचे अर्बन डिझाईनिंग करण्याच्या नावाखाली 425 कोटी रुपये खर्च करुन वराती मागून घोडे नाचवून कोणत्या नाथाच्या इशाऱ्यावर सिडको कर्मचाऱ्यांना व प्रकल्पग्रस्त अनाथ करण्याचा गोरखधंदा करत आहे, हे अनाकलनीय आहे. या निविदा प्रक्रियेस सिडको कर्मचारी युनीयनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी विरोध केला असून सदर निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे