Breaking News
मुंबई : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आतापर्यंत रुग्णाला दाखल केल्यानंतर, त्याच्या पॅकेजमधील असलेल्या उपचाराचा खर्च रुग्ण डिस्चार्जपर्यंत केला जायचा. मात्र, त्यानंतर आजाराच्या फॉलोअपसाठी काही महागड्या चाचण्या कराव्या लागल्या, तर त्या रुग्णाला स्वखर्चातून कराव्या लागत असे. परंतु कॅन्सरच्या बाबतीत आता पॅकेजमधून खर्च करून रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर, फॉलोअपमध्ये काही चाचण्या कराव्या लागल्या, तर त्याचा खर्च या योजनेच्या पॅकेजमधून केला जाणार आहे.
कॅन्सरवरील उपचारानंतर फॉलोअपसाठी जेव्हा रुग्ण तपासणीसाठी येत असतात. त्यावेळी त्यांना लिक्विड बायोप्सी, तसेच कॅन्सरशी संबंधित खर्चिक चाचण्या कराव्या लागायच्या. काही चाचण्या 15 ते 20 हजारांच्या घरात खर्च येत असे. गेल्या काही वर्षांपासून कोणत्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश पॅकेजमध्ये करण्यात यावा, याबाबत डॉक्टरांमध्ये चर्चा होती. अखेर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेच्या अध्यक्षतेखाली काही कर्करोग तज्ज्ञ डॉक्टरांनी कोणत्या फॉलोअप चाचण्या पॅकेजमधून करण्यात याव्यात, हे सुचविले. त्यानुसार, त्या चाचण्या लवकरच या पॅकेजमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेत राज्यातील 1,000 रुग्णालयांचा यात सहभाग असून, आजाराची संख्या 996 वरून 1,356 इतकी केली. या योजनेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सर हा दुर्धर आजार असून, या आजारचे उपचार घेऊन रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला नियमित फॉलोअपची गरज असते. त्या काळात त्याला आजार आटोक्यात आला आहे की नाही, हे पाहण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. त्यामध्ये सीटी स्कॅन, पेट स्कॅन, बायोप्सी, एमआरआय यांसह आणखी कॅन्सर आजाराशी निगडित चाचण्या कराव्या लागतात. त्यासाठी लागणारा खर्च अधिक असतो. त्यामुळे या चाचण्या आता योजनेच्या पॅकेजमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीलाही पाठविण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस