Breaking News
सिडको भवन इमारतीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न ; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दुर्घटना टळली
पनवेल : नैना प्रकल्पाला विरोध करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवन समोर आंदोलन केले. मंगळवारी आंदोलकांनी इमारतीवर जावून उडी मारण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या आंदोलकांमध्ये ॲड. सूरेश ठाकूर, शिवकर गावाचे माजी सरपंच अनिल ढवळे, ॲड. मदन गोवारी, नरेश भगत, दत्ता भगत, गडकिल्ले अभ्यासक सूधाकर लाड यांचा समावेश आहे.
नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू करण्यात आला आहे. या समितीने नेना प्रकल्प रद्द करण्याची मागणीही केली आहे. गावठाण विस्तार योजना तत्काळ राबविण्यात यावी. गरजेपोटी बांधलेली घरे नियमीत करावी अशी मागणीही केली आहे. गावठाण विस्तार योजना राबविण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. पळस्पे गावाजवळ शेतकऱ्यांनी नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण केल्यावर सिडको मंडळाचे मुख्य नियोजनकार रविंद्र मानकर यांनी शेतकरी अनिल ढवळे यांना 26 जूनला दिलेल्या आश्वासन पत्रात नैना परिक्षेत्रातील परंतू गावठाण क्षेत्राबाहेरील राहत्या घरांखालील जमिनींच्या मालकी हक्क व इतर बाबींची तपासणी झाल्यानंतर मालमत्ता पत्रक (प्रोपर्टी कार्ड) विहीत कार्यपद्धती अवलंबून तीन महिन्यात देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच महिने झाले तरी मालमत्ता पत्रक देण्याची कार्यवाही न झाल्याने संतप्त आंदोलकांनी हा पवित्रा घेतला.
पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत अनिल ढवळे यांनी निवेदन दिले होते. पोलीस विभागाचे पोलीस मंगळवारी ढवळे आणि इतर आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. अखेर दुपारी सव्वा वाजण्याच्या सूमारास आंदोलक सिडको भवनाच्या प्रवेशव्दारावर आल्यावर त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी सिडको मंडळाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधला आहे. मात्र ही कार्यवाही नेमकी किती दिवसात पुर्ण होईल याबाबत साशंकता असल्याने शेतकरी संतापले आहेत. शासनाने 10 वर्षांपुर्वी नैना प्राधिकरण पनवेल, उरण व इतर तालुक्यांमध्ये जाहीर केले. मात्र नैनाच्या प्रारुप विकास आराखड्यामुळे गावठाणांबाहेरील घरे अनियमित ठरविली गेली. आजोबांपासून राहणारे घर अचानक कसे बेकायदा ठरले यासाठी हे शेतकरी लढत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai