बेकायदेशीररित्या कोविशिल्ड लस विकणार्‍यास अटक

पनवेल ः मागील एक वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. एकीकडे या साथरोगाला अटकाव घालण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत तर दूसरीकडे यावरील औषधे, इंजेक्शन, लसीकरण यात काळा बाजार करणारे समाजकंटक देखील सक्रिय झाले आहेत. नुकतेच पनवेलमध्ये लसीकरणात काळाबाजार करणार्‍या एकाला अटक केली आहे. 

कोरोनाच्या उपचार पद्धतीत वापरले जाणार्‍या रेमडिसिवीरचा काळाबाजार यापुर्वी मोठ्या प्रमाणात समोर आला होता. त्याचप्रमाणे लसीकरणात देखील अशाचप्रकाराचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.  नवी मुंबईचे पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार किशोर कुमार खेत हा कामोठे येथील राजीव गांधी ब्रिज सेक्टर 8, नेरूळ नवी मुंबई येथे कोविशिल्ड लस बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्याकरिता विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार सहा.पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली औषध निरीक्षक अजय माहुले यांच्यासह सदर ठिकाणी सापळा लावून हा बोगस गिर्‍हाईकास कोविशिल्ड लसीचे 15 डोस हे एकूण 60 हजारात विक्री करीत असताना त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडील लसी जप्त करण्यात आल्या. औषध निरीक्षक अजय माहुले यांच्या तक्रारीवरून नेरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी किशोर कुमार खेत (21) हा बेरोजगार असून तो कामोठे सेक्टर 36 महादेव सोसायटीत वास्तव्यास आहे. तो मुळचा राजस्थानचा आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष 02 नवी मुंबई करीत आहे. सदर कारवाईत पो.उप.नि. रोंगे, पाटील, स.पो.उपनि. साळुंखे, पो.ह.अनिल पाटील, सचिन पवार, सचिन म्हात्रे, सुनील कुदले, संजय पाटील, इंद्रजित कानू, वाघ, काटकर, प्रफूल मोरे, गडगे, सूर्यवंशी, भोपी हे होते.