ज्येष्ठ नागरिकांसाठीची मुदत ठेव योजना बंद होण्याच्या मार्गावर

मुंबई ः देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेसह अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली विशेष मुदत ठेव योजना लवकरच बंद करणार आहेत. बँकांनी सुरू केलेली ही योजना 30 सप्टेंबर रोजी बंद होईल.

कोरोना साथीच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ देण्यासाठी बँकांनी मे 2020 मध्ये विशेष मुदत ठेव योजना सुरू केली. बँकांच्या विशेष मुदत ठेव योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळतं. देशातल्या बहुतेक बँका ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज देतात. परंतु, विशेष मुदत ठेव योजनेमध्ये त्या व्याजावर अतिरिक्त व्याजाचा लाभ दिला जातो. निवडक परिपक्वता कालावधीसह मुदत ठेवींमध्ये लागू व्याज दरापेक्षा 0.50 टक्क्यांपर्यंत आणि त्यापेक्षा जास्त व्याज ज्येष्ठ नागरिकांना मिळतं. बँकांनी ज्येष्ठ नागरिकांना लाभ देणार्या या योजनेची मुदत अनेक वेळा वाढवली आहे. ही योजना आधी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती. यानंतर ती 31 डिसेंबर 2020 पर्यंत आणि नंतर 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली. या वर्षी ती 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली. यानंतर ती पुन्हा एकदा 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ देण्यासाठी स्टेट बँकेने मे 2020 मध्ये एसबीआय वेल्फेअर वरिष्ठ नागरिक मुदत ठेव योजना जाहीर केली होती. याअंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या मुदत ठेवींवर 0.80 टक्के जास्त व्याज दर मिळतं. सध्या सामान्य लोकांना पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.40 टक्के दराने व्याज मिळत आहे. परंतु, ज्येष्ठ नागरिकांना विशेष योजनेअंतर्गत 5 वर्षांपेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवीवर 6.20 टक्के व्याज मिळतं.

स्टेट बँकेनंतर बँक ऑफ बडोदा ‘विशेष ज्येष्ठ नागरिक एफडी योजने’अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एक टक्का अधिक व्याज देत आहे. यानंतर, आयसीयआयसीआय बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्ण वर्ष योजना चालवते. यासोबतच, एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सीनियर सिटीझन केअर एफडी’ नावाची योजना सुरू केली होती. या अंतर्गत, एचडीएफसी बँक मुदत ठेवींवर 0.25 टक्के अतिरिक्त प्रीमियम देत आहे.