सिडकोच्या 18 हजार नस्ती गहाळ

सिडकोच्या दक्षता विभागाने केली कारवाई सुरु 

नवी मुंबई  : गत 40 वर्षात सिडकोने बांधून विक्री केलेली घरे व दुकानांच्या 18 हजार 12 फाईल्स गायब झाल्याचे इस्टेट (शहर सेवा) विभागातील अधिकार्‍यांनी सामाजिक कार्यकर्ते राजीव मिश्रा यांना माहिती अधिकारात दिलेल्या अहवालातून उघडकीस आले आहे. सिडकोच्या दक्षता विभागाने याची दखल घेत कारवाई सुरु केल्याने सिडकोत खळबळ माजली असून अवैध विक्रीचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

सिडकोने 1975 पासून आजतागायत 1 लाख 38 हजार 505 घरे व दुकानांची निर्मिती नवी मुंबईत केली आहे. यापैकी 1 लाख 35 हजार 595 सदनिका व दुकाने विकली गेली असून 2 हजार 910 सदनिका व दुकाने  सिडकोकडे पडून आहेत. या शिल्लक असलेल्या घरांचा व दुकानांचा आढावा शहर सेवा विभागाने घेतला असता त्यांनी विकलेल्या घरे व दुकानांपैकी फक्त 86 हजार 177 फाईल्स या परिपुर्ण असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे सिडकोने विक्री केलेली घरे व दुकानांच्या 31 हजार 406 फाईल्स सिडकोच्या मूळ रेकॉर्डशी जुळत नसल्याचे व्यवस्थापनाला कळविण्यात आले आहे. त्यामुळे सदर 31 हजार 406 फाईल्सद्वारे सिडकोच्या सदनिका व दुकानांची अवैध विक्री झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.   परंतु यासर्व गोंधळात सिडकोने विकलेल्या सदनिका व दुकानांच्या 18 हजार 12 फाईल्स या गायब असल्याचे शहर सेवा विभागाच्या निदर्शनास आले असून त्यांनी त्याबाबतचा अहवाल सिडको व्यवस्थापनास दिला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिडकोतील फाईल्स गायब होण्यामागे काय गौडबंगाल आहे असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे. या फाईल्स गहाळ होण्यामागे सिडकोतील मोठे अधिकारी व कर्मचार्‍यांचा हात असल्याची चर्चा सिडको वर्तुळात आहे.  

दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात फाईल्स गहाळ झाल्याबाबतचा अहवाल सिडको व्यवस्थापनाकडे उपलब्ध असतानाही याबाबत अद्याप कोणतीही कारवाई संबंधित विभागातील अधिकार्‍यांवर न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिडकोतील 18 हजार 12 फाईल्सना पाय फुटून त्या गायब होऊन देखील सिडको व्यवस्थापनाने याबाबतची तक्रार अद्याप पोलिस स्टेशनला दिलेली नाही. परंतु याप्रकरणाची सिडकोच्या दक्षता विभागाने गंभीर दखल घेत या घोटाळ्याची चौकशी सुरु केल्याने सिडकोत खळबळ उडाली आहे. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानंतर सिडकोतील फाईल्सची स्वच्छता मोहीम जोरदार सुरु आहे. 

माहिती अधिकारात देण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांचे म्हणणे असून अनेक फाईल्सचा शोध लागला असल्याचे त्यांनी सागितले. सिडकोने आतापर्यंत बांधलेल्या सदनिका व घरांचा डाटा एकत्रित करण्याचे व शोधण्याचे काम ध्रुव कन्स्लटंन्सीला गत एप्रिल महिन्यात देण्यात आले असून व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या आदेशानुसार प्रत्येक विभागात फाईल्सचे क्लासिफिकेशन करण्याचे काम जोमाने सुरु आहे. त्यात सिडकोच्या अनेक गहाळ फाईल्स आढळून आल्याचे मोहन निनावे यांनी सांगितले.