Breaking News
मुंबई-नाशिक महामार्गाची शहापुर-आसनगाव दरम्यान चाळण
मोना माळी/सणस
मुंबई ः मुंबई ते नाशिक दरम्यानचा 150 किलोमीटरचा चार ते साडेचार तासांचा प्रवास तेथील खड्ड्यांमुळे, संथपणे सुरु असलेल्या कामांमुळे सध्या आठ ते दहा तासांवर गेला आहे. वाहतूक कोंडीत वाहनधारक सात-आठ तास अडकून पडत असल्याने पैसा, वेळ व इंधन वाया जात असून हा प्रवास वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे. मात्र अशा खड्डेमय आणि दुरावस्था झालेल्या रस्त्यावरील टोल वसूली काही थांबलेली नाही. महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून दिवस प्रवासात जात असला तरी वसूली जोरात सुरु असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत रस्ता दुरुस्त होऊन प्रवासासाठी मोकळा होत नाही तोपर्यंत टोल रद्द करा अशी मागणी जोर धरु लागली आहे.
मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरांना जोडणारा मुंबई-नाशिक महामार्ग हा महत्वाचा मार्ग आहे. मात्र या मार्गावरील प्रवास आता डोकेदुखी ठरु लागला आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे अपघात तसेच वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसत आहे. सध्या रस्त्याची विविध कामे सुरू असल्याने वाहतुकीच्या समस्येत भर पडत आहे. मोठमोठे खड्डे आणि वाशिंद ते आसनगाव दरम्यान उड्डाणपुलाचं संथ गतीनं सुरू असलेले काम, यामुळे ही कोंडी होत आहे. (पान 7 वर)
तिथं एक ते दोन मीटर परिघाचे खड्डे पडलेत. त्यामुळे वाहनांचा वेग अक्षरशः ताशी एक ते दोन किमीवर येतो. वाहनांच्या आठ ते दहा किमीच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे चार ते साडेचार तासांचा प्रवास सात ते आठ तासांवर गेला आहे. या वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक उद्योग व्यावसायिकांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. आसनगाव शहापूर हे एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड दीड तासाचा अवधी लागत आहे. संपूर्ण महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असला तरी महामार्गावरील टोलवसूली काही थांबलेली नाही. ती सुरुच असल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत या मार्गाची पुर्णपणे दुरुस्ती होत नाही तोपर्यत येथील टोलवसूली रद्द करा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस