होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी?
- by Aajchi Navi Mumbai
- May 24, 2024
- 960
अधिकृत होर्डिंगच्या मंजुर आकारमानाच्या तपासणीची मागणी
नवी मुंबई ः घाटकोपर येथील अनधिकृत होर्डिंग दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पालिकेने पालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दिले आहेत. या आदेशानंतर पालिका प्रशासनाने 34 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केल्याने परवाना व विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांची संबंधित ठेकेदारांकडून मिळत असलेली रौनक कमी झाल्याने नाराजी पसरली आहे. आयुक्तांनी फक्त अनधिकृत होर्डिंगवर कारवाई न करता अधिकृत होर्डिंगच्या आकारमानाच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
घाटकोपर येथे अनधिकृत होर्डिंगची दुर्घटना होऊन 16 व्यक्तींना आपले प्राण नाहक गमवावे लागले. यावर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने सर्वच महापालिकांना त्यांनी दिलेल्या अधिकृत होर्डिंगच्या सुरक्षिततेबाबत तसेच शहरात उभे असलेल्या होर्डिंगचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. याचाच भाग म्हणून महापलिकेच्या प्रशासक विभागाने आतापर्यंत 34 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली आहे. गेली अनेकवर्ष ही अनधिकृत होर्डिंग शहरात उभी असताना त्याची दखल विभाग अधिकारी व परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी का घेतली नाही असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे. डीजीटल इंडियच्या जमान्यात होर्डिंग जाहिरातीला वेगळेच महत्व प्राप्त झाले असून एका होर्डिंगवर जाहीरात लावण्यासाठी ठराविक कालमर्यादेसाठी लाखो रुपये होर्डिंगधारकाकडून आकारले जातात. अशा या अनधिकृत गोरखधंद्यातून मिळणाऱ्या रौनकचे अनेकजण भागीदार असल्याची चर्चा सध्या महापालिकेत दबक्या आवाजात आहे.
पालिकेने जाहीरातीतून उत्पन्न मिळावे म्हणून जाहीरात धोरण बनवले असून त्या माध्यमातून शहरात अनेक अधिकृत होर्डिंग उभारण्यात आली आहेत. परंतु, पालिकेने मंजुर केलेले आकार आणि प्रत्यक्ष जागेवर उभारलेल्या होर्डिंगच्या आकारात बरीच तफावत असल्याची चर्चाही पालिकेत आहे. या तफावतीचा मोबदला म्हणून अनेकांना त्यातून दरमहिन्याला रौनक मिळते म्हणूनच त्याकडे संबंधित अधिकारी जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. पालिका आयुक्तांनी या अधिकृत होर्डिंगच्या आकारमानाबाबत तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यातून परवाना विभागातील ‘पावर'फुल अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडेल असे बोलले जात आहे त्यामुळे पालिका आयुक्त शिंदे यांनी कारवाईचा बडगा फक्त अनधिकृत होर्डिंगबाबत सिमित न ठेवता अधिकृत होर्डिंगच्या आकारमानाबाबतही बडगा उगारल्यास त्यातून मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परवाना व विभाग कार्यालयातील विभागातील अधिकाऱ्यांची कारवाईच्या भितीने झोप उडाली आहे.
- दरमहिन्याला रौनक
शहरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्समधून पालिका अधिकाऱ्यांच्या पदरात दरमहिना रौनक पडत असल्याची चर्चा सध्या पालिकेत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग्ज उभे राहत असताना ते विभाग अधिकारी आणि परवाना विभागातील अधिकारी यांच्या नजरेत न येणे यातच पालिका अधिकारी आणि अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्यांचे साटेलोटे दिसून येते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai