Breaking News
प्रारुप विकास आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने अडवली-भुतवली येथील सूमारे 200 हेक्टरहून अधिक प्रादेशिक उद्यान क्षेत्रातील जमिन रहिवाशी भुवापरासाठी खुली केल्यानंतर सिडकोनेही प्रादेशिक उद्यान क्षेत्रातील नेरुळ येथील करावेद्वीप रहिवाशी वापरासाठी खुले केले आहे. हे पाऊल दोन्ही प्राधिकरणांनी ठाणेदाराच्या दबावाखाली उचलल्याचे बोलले जात असून या दोन्ही प्रकरणात अधिकाऱ्यांबरोबर विकासकांचेही चांगभलं झाल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील करावेद्वीप हे नवी मुंबईच्या नियोजनात समाविष्ट असले तरी तेथील जमिनी या थेट खाडी लगत असल्याने सिडकोने संपादित केल्या नाहीत. नवी मुंबई शहराचे नियोजन करताना सिडकोने करावेद्वीप हे प्रादेशिक उद्यान क्षेत्र म्हणून आरक्षित केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी काही विकासकांनी कवडीमोल दराने विकत घेतल्या. हे क्षेत्र ना विकसन क्षेत्रात येत असल्याने त्याचा विकास करणे संबंधित विकासकांना गेले 25 वर्ष शक्य झाले नाही. दरम्यान, सदर क्षेत्र नवी मुंबई महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्याने महापालिकेतील राजकर्त्यांना वगळून या द्वीपाचा विकास शक्य नसल्याने विकासकांनी शासनाकडे याबाबत तकादा लावला होता.
देवेंद्र फडणवीस नगरविकास मंत्री असताना 31 ऑक्टोबर 2017 रोजी करावे द्वीपासह दिघे, उथन, टेटवली, रबाले, घणसोली, महापे, बोरिवली, पाडेघर, वहाळ, नागाव, चाणजे व इतर काही गावांच्या भुखंडांच्या विकासासाठी सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरणाचे अधिकार देण्यात आले. त्यासाठी करावे गावचे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार नवी मुंबई महापालिकेकडून काढून ते सिडकोला प्रदान करण्यात आले. सिडको थेट सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने फडणवीस यांनी विशेष नियोजन प्राधिकरणाच्या नावाखाली हा मास्टरस्ट्रोक खेळल्याची चर्चा आहे.
मार्च 2024 मध्ये सिडकोने करावे द्वीपाचा प्रारुप विकास आराखडा बनवला असून सूचना व हरकतींसाठी तो प्रसिद्ध केला होता. प्रादेशिक उद्यान क्षेत्रातील बरेचशे क्षेत्र सिडकोने रहिवाशी वापरासाठी खुले केल्याचे या प्रारुप विकास आरखड्यावरुन दिसत आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे करावे द्वीपावर टोलेजंग इमारती उभ्या करण्याचे विकासकांचे स्वप्न या निर्णयामुळे पुर्णत्वास जाणार असून त्यास सिडको व नगरविकास विभागातील ठाणेदारांचे अर्थपुर्ण सहकार्य मिळाले असल्याची चर्चा नवी मुंबईत जोरात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai