Breaking News
आगामी निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी सरसावल्या बाह्या
नवी मुंबई ः मुख्यमंत्री जरी शिंदे असले तरी आमचे नेते केवळ फडणवीसच या वाक्याने दुखावलेल्या शिंदे गटाने नाईकांना धडा शिकवण्याचा निर्धार केल्याचे सुत्रांकडून कळत आहे. ऐरोली किंवा बेलापुर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकण्याचा मानस शिंदेगटाने जाहीर केला असून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत यावेळी चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे-पालघर जिल्ह्यात विधानसभेच्या 27 जागा असून राज्य स्थापनेचा मार्ग या जिल्ह्यातून जातो. या दोन्ही जिल्ह्यांवर एकनाथ शिंदे यांची मजबूत पकड असून त्याखालोखाल ठाकरे यांच्या सेनेची आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पालघर येथे महायुतीचे हेमंत सावरा, ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर भिवंडीतून महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे निवडून आले आहेत. महाराष्ट्रात भाजपपेक्षा शिंदे सेनेचा विजयीदर जास्त असल्याने यावेळी जास्तीत जास्त जागांवर दावा ठोकण्याचा निर्णय शिंदे सेनेने घेतला असून त्याबाबतचे वक्तव्य त्यांच्या विद्यमान आमदारांकडून होत आहेत.
यापार्श्वभुमीवर ‘लाडकी बहिण' या शासनाच्या योजनेच्या प्रचारासाठी शिंदेसेनेचे नेते विजय नाहटा व विजय चौगुले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सूचक वक्तव्य केले. यावेळी ऐरोली किंवा बेलापुर पैकी एक जागा शिंदे सेनेकडून लढवण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी भाजपला आपल्याला हव्या त्या जागा पदरात पाडून घेतल्याने याहीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा शब्द फडणवीस डावलण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. एकवेळ अजित पवार यांना डावलले तरी चालेल पण शिंदे यांना डावलणे भाजपला महाग पडेल असा प्रवाह भाजपात असल्याने याहीवेळी शिंदे यांची मागणी मान्य होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आढावा बैठकीत गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री जरी शिंदे असले तरी आमचे नेते फडणवीस असल्याचे वक्तव्य केले होते. याचा राग शिंदे यांना आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात असून नाईकांना योग्य जागा दाखवून देण्याची सूचना त्यांनी नवी मुंबईतील आपल्या शिलेदारांना दिली आहे. या पार्श्वभुमीवर शिंदेसेनेचे नेते विजय नाहटा व विजय चौगुले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील वक्तव्य सूचक असून कोणत्याही परिस्थितीत यावेळी शिंदेसेना नाईकांविरोधात शड्डू ठोकतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे या राजकीय चक्रव्युहातून गणेश नाईक कसे मार्गक्रमण करतात याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai